माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचे वीज बिल भरले नाही, इंजिनियरला हजार रुपये दिले की झालं काम; केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितला अजब किस्सा
बुलढाणा : मी शेतकरी आहे. माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचे वीज बिल भरले नाही, माझ्या आजोबांनी पण नाही , माझ्या वडिलांनी पण नाही आणि मी देखील वीज बिल भरलेले नाही. किंबहुना विजेची डी.पी. जळाली तर संबंधित इंजिनियरला एक हजार रुपये दिले की झालं काम!
असा अजब किस्सा शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संगीतलाय. बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथे दोन केंद्रीय मंत्र्याचा नागरी सत्कार करण्यात आला. यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी बोलताना मंत्री प्रतापराव जाधव यांनी हा वक्तव्य केलं आहे.
जसं दोन सम विचारी बैल शेतीत जुंपले की शेती चांगली होते, तस सरकारच आहे. केंद्र आणि राज्य सरकार समविचारी असले की विकास होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रत्येक खासदारांवर, प्रत्येक खात्यांवर बारीक लक्ष असतं. असेही मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. असे असताना मात्र, मी मंत्री झाल्यावर आमचा सामान्य माणसाशी संपर्क कमी होतो आहे, याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
पंतप्रधान मोदींनी दिलेला 400 पारचा नारा आमच्याच अंगलट आला
गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी दिलेला 400 पारचा नारा हा आमच्याच अंगलट आला असल्याची कबुलीही मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिली. 400 पारच्या नाऱ्यामुळे आमचे कार्यकर्ते गाफील राहिले. असे असले तरी परत एकदा शिस्तीने चालणारा पंतप्रधान आपल्या नशिबाने आपल्या देशाला मिळाला आहे. अनेक जटिल प्रश्न त्यांनी सहज सोडवलेले आहेत.2029 नंतर आमच्या सोबत 33 टक्के महिला लोकसभेत असतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केलाय.
सावत्र भाऊ देखील अस वागत नाही
सत्तेच्या लालसेपोटी आपली शिवसेनेशी युती तुटली. आम्हाला उद्धव ठाकरे यांचा तो निर्णय पटला नाही.पण एका बाजूला आशा होती की आपला नेता मुख्यमंत्री झाला तर न्याय मिळेल. पण आमचा नेता घरात बसून कारभार करत होता. कुणालाही वेळ देत नव्हता. असे म्हणत मंत्री प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. आमच्या लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे काँग्रेसवाले कोर्टात गेले. सावत्र भाऊ देखील अस वागत नाही, असेही मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.