प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले येणार एकत्र ? अध्यक्ष पदाची दिली थेट ऑफर
प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष पद स्वीकारावे रामदास आठवले यांची साताऱ्यात खुली ऑफर दिली आहे. त्यासाठी विविध राजकीय खेळी सुरु असून चर्चांना उधाण आले आहे. आता केंद्रीय मंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांना थेट ऑफर दिली आहे. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बरखास्त करून घटना तज्ज्ञ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ऐक्यासाठी अध्यक्ष पद स्वीकारावे .या कृतीमुळे या पक्षाची महाराष्ट्रात ताकद वाढणार आहे तुमच्यासाठी मी स्वतः अध्यक्षपद सोडायला तयार आहे अशी थेट ऑफर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त ते साताऱ्यात आले होते. यावेळी रिपाईचे राज्य प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, सरचिटणीस गौतम सोनवणे, पर्यावरण विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण ढमाळ, रिपाई सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.रामदास आठवले पुढे म्हणाले, "घटना तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन ऑफ इंडिया व मजूर पार्टी या दोन पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना महाराष्ट्रात यश आले नाही. त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी स्थापलेला पक्ष हा खरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे .तो पक्ष आम्ही चालवत आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अन्य गटाने मतभेद विसरून मूळ रिपाई पक्षांमध्ये सामील व्हावे. यामुळे महाराष्ट्रात आपले राजकीय ऐक्य वाढणार आहे. वंचित बहुजन आघाडी ही प्रकाश आंबेडकर यांनी बरखास्त करून डॉ. बाबासाहेबांचे वारस म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मूळ पक्षामध्ये सामील व्हावे आणि स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष पद स्वीकारावे त्यांच्यासाठी मी स्वतः अध्यक्षपद सोडायला तयार आहे या पक्षाच्या माध्यमातून ऐक्य वाढले तर सत्तेमधील आपला सहभाग हा निश्चित आहे," असे ठामपणे आठवले यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, "मात्र मी दिलेल्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर कधीही भाष्य करत नाहीत. त्यांनी एक पाऊल पुढे टाकावे त्याच्या पुढचे एक पाऊल टाकायला मी तयार आहे अशी ऑफर त्यांनी दिली. महायुतीने यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या तीन प्रादेशिक विभागात आठ विधानसभेच्या जागा द्याव्यात दोन महामंडळे आणि विधान परिषदेच्या बारा आमदारांमध्ये एक जागा रिपाईला सोडण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या 170 जागा येतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीला संविधान बदल तसेच वेगवेगळ्या मुद्द्यावर केलेला खोटा प्रचार असल्याने यश मिळणार नाही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली आहे. त्याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकात बसेल. महाराष्ट्रात काँग्रेसला यश मिळणार नाही," असे ठामपणे आठवले यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यामध्ये फलटण विधानसभा मतदारसंघाचे आरक्षित जागा रिपाईला मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली केंद्र शासनाने समान नागरी कायदा आणि वक्फ बोर्ड कायदा आणण्याची तयारी चालवली आहे हे दोन्ही कायदे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही वक्फ बोर्ड कायदा हा प्रस्थापितांची एकाधिकारशाही मोडून मुस्लिम समाजाला फायदा करून देणारा कायदा आहे समान नागरी कायद्यामुळे हिंदू व मुस्लिम समाजामध्ये संबंध समन्वयाचे राहणार आहेत या कायद्याविषयी गैरसमज पसरवला जाऊ नये असे ते म्हणाले .जम्मू काश्मीर येथील निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चार उमेदवार उभे करण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टीला येथे रिपाईने पाठिंबा दिलेला आहे सत्ता कोणाची असो त्यामध्ये रामदास आठवले यांचा सहभाग असतोच अशी राजकीय टिप्पणी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. या प्रश्नावर बोलताना रामदास आठवले यांनी मिश्किली केली ते म्हणाले, मला राजकीय हवेचा रोख कळतो मी ज्या पक्षाला पाठिंबा देतो ते सरकार सत्तेमध्ये येते. त्यांच्या या विधानावर पत्रकार परिषदेत हशा पिकला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.