'अपात्र ठरल्यानंतर नरेंद्र मोदींनी केला फोन, पण अट होती, त्यामुळे..'; विनेश फोगाटचा खुलासा
भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचं स्वप्न पूर्ण करता आले नाही. अंतिम फेरीच्या काही तास आधी केलेल्या वजन चाचणीत विनेशचे १०० ग्रॅम वजन जास्त भरले. त्यामुळे ऑलिम्पिक व्यवस्थापन समितीने विनेशला अपात्र ठरवण्यात आले.
या अनपेक्षित निर्णयाचा सर्वांनाच मोठा धक्का बसला. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी फोनवरूनही संवाद साधला. यानंतर आता विनेश फोगाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे.विनेश फोगाटने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “मला ऑलिम्पिकमधून जेव्हा अपात्र करण्यात आले. तेव्हा नरेंद्र मोदींना फोन आला होता. पण त्यांचा मला थेट फोन आला नाही. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की पंतप्रधान मोदी यांना त्यांच्याशी बोलायचे आहे. त्यावेळी मी चालेल म्हणाले. पण त्यानंतर त्यांनी माझ्यासमोर काही अटी ठेवल्या", असा दावा विनेशनं केला आहे.
नरेंद्र मोदींसोबत बोलताना त्यांनी काही अटी घातल्या होत्या की, “बोलत असताना माझा एकही माणूस माझ्यासोबत नसणार. त्यांचा एक माणूस असेल जो फोनवर बोलणं करुन देईल आणि दुसरा व्हिडीओ शूट करेल.मी हा व्हिडीओ सोशल मीडियावर जाईल का असे विचारले तेव्हा त्यांनी हो म्हटले. त्यावेळी मी नकार दिला, कारण मला माझ्या भावनांची खिल्ली उडवायची नव्हती.”
दरम्यान, विनेश फोगटने यावेळी मोदींवर आरोप केला. "जर त्यांना आमच्याशी बोलायचे असते आणि त्यांना खेळाडूंची काळजी असती, तर त्यांनी आमचं संभाषण रेकॉर्ड न करता फोन केला असता. कदाचित त्यांना हे माहिती आहे की ज्या दिवशी विनेश बोलेल त्या दिवशी ती गेल्या दोन वर्षांचा हिशेब नक्की मागेल. म्हणूनच त्यांनी माझ्या बाजूने कुणाचाही फोन त्या संभाषणावेळी तिथे नसेल अशी अट ठेवली होती. कारण ते झालेलं संभाषण एडिट करून टाकू शकतात. पण मी तर बोललेलं सगळं एडिट न करता टाकेन. मग त्यांनी यासाठी नकार दिला", असं विनेश फोगट म्हणाली.
विनेश फोगाट विधानसभा निवडणूक लढणार
विनेश फोगाटने कुस्तीला रामराम करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसकडून ती हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत उतरली आहे. जुलाना या मतदारसंघातून तिला काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.