Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दीक्षाभूमीवर निळ्या पाखरांचे थवे...; देश-विदेशातून पोहोचले अनुयायी

दीक्षाभूमीवर निळ्या पाखरांचे थवे...; देश-विदेशातून पोहोचले अनुयायी
 
 
नागपूर: पवित्र दीक्षाभूमीवर ६८ वा धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा होणार आहे. यानिमित्ताने गेल्या तीन दिवसांपासून देशविदेशातून निळ्या पाखरांचे थवे दाखल झाले आहेत. दीक्षाभूमीचे रस्ते निळ्या अन् पंचशील झेंड्यानी फुलून गेले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर नतमस्तक होण्यासाठी अनुयायी येत आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणादरम्यान भूमिगत पार्किंगवरून समाजात आक्रोश निर्माण झाला होता. यामुळे उसळलेला संताप अनेक अनुयायांमध्ये आजही दिसत होता. दोन दिवसांपासून मध्ये-मध्ये होणाऱ्या पावसामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले. अनुयायांना त्रास सहन करावा लागत आहे.

धम्मचक्र प्रवर्तनदिन अनुयांयासाठी प्रेरणा व ऊर्जा देणारा असतो. यामुळे खरा आंबेडकरी अनुयायी जगात कुठेही असला तरी तो या दिवशी दीक्षाभूमीवर येतो. यंदा पावसाने काहीशी अडचण केली असली तरीही संख्या कमी झालेली नाही. रेल्वे स्टेशन, बस स्टॅंडसह शहरात येणाऱ्या चहुमार्गाने अनुयायी दीक्षाभूमीच्या दिशेने येत आहेत. दीक्षाभूमीवर फेरफटका मारला असता, जागोजागी संविधानावर बोलू काही अशी चर्चा रंगली आहे. निळ्या झेंड्यासाठी काहीही करण्याची तयारी तरूण अनुयायी करताना दिसत आहेत. सोबतच, बाबासाहेबांचा जयजयकार करीत खांद्यावर निळा झेंडा, डोक्यावर गाठोडे व कंबरेवर लहान मुले घेऊन मायमाऊली आपल्या मुलांसह दिसत आहेत.

जमिनीच्या वर आलेल्या सळाखी धोकादायक

दीक्षाभूमीवर सौंदर्यीकरणासाठी करण्यात आलेला खड्डा बुजविण्यात आला. मात्र, पावसानंतर बुजविलेल्या खड्डयातून जमिनीतील सळाखी काही ठिकाणी बाहेर आल्या आहेत. त्यावर तुर्तास प्लास्टिक पोते बांधले असले तरी त्यामुळे धोका होऊ शकतो. निष्काळजीपणाने खड्डा बुजविण्याचे काम झाले. याकडे प्रशासन व स्मारक समितीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, पावसामुळे दीक्षाभूमी परिसरात झालेला चिखलावर उपाय म्हणून चुरी टाकण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

सेवेसाठी स्टॉल्सच्या माध्यमातून पुढाकार

विविध सामाजिक संघटनांतर्फे विविध स्टॉल्स सजले आहेत. सरकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल्स दीक्षाभूमी परिसराबाहेरील रस्त्यांवर सजले आहेत. येथे कर्मचारी व सामाजिक संघटना देशभरातून येणाऱ्या अनुयायांना योजनांची माहिती देऊन मदत करतात. समाजातील घटकांच्या भल्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा व माहिती देण्यासाठीची त्यांची धडपड लक्षवेधी ठरत आहे. यात सेवेत असलेले सरकारी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनाही पुढे सरसावल्या आहेत.

संस्थांकडून आरोग्य सेवेसाठी शिबिरांचे आयोजन

दीक्षाभूमीवर आरोग्य सेवेसाठी अनेक स्टॉल्स आहेत. मेडीकलचे पथकासोबतच विविध संघटनांकडून आरोग्य सेवा देण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. २४ तास अविरत ही सेवा असते. आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी,चष्मे वितरण यासह चांगली प्रकृती राहावी यासाठी औषधांचे वितरणही करण्यात येत आहे.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.