अहमदनगर: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी संपन्न झाली. आरोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे वाटप अशा अनेक गोष्टींनी विधानसभा चांगलीच गाजली.
काल 4180 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. एकीकडे एक्झिट पोलचे आकडे समोर येत होते. दुसरीकडे अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाथर्डीच्या आमदार आणि भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आमदार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रकार आज सायंकाळी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील मतदान केंद्रावर झाला. तर आक्रमक जमावापासून बचाव व्हावा म्हणून राजळे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतःला मतदानकेंद्राच्या खोलीत कोंडून घेतले. उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत दोन तास मतदानकेंद्रात बसून असलेल्या राजळे यांची सुटका केली तर या घटनेने संतप्त झालेल्या हजारो राजळे समर्थकांनी रात्री शहरातील माणिक दौंडी चौकात रास्तारोको आंदोलन सुरु केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत राजळे आणि त्यांचे चार समर्थक किरकोळ जखमी झाले आहे.
नेमकं काय घडलं?
या प्रकरणी मात्र राजळे यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने या संदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आली नव्हती. या प्रकरणाने मात्र किरकोळ शाब्दिक चकमक वगळता शांततेत पार पडलेल्या मतदानप्रक्रियेस गालबोट लागले. आज सायंकाळी राजळे या शिरसाठवाडी मतदानकेंद्रावर वाद सुरु असल्याचे समजल्यावर त्या ठिकाणी गेल्या असता तेथे शेकडो युवक जमा झाले आणि त्यांनी राजळे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी या तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसदल अपुरे असल्याने उपयोग झाला नाही. या नंतर राजळे यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. ती चालू असतानाच राजळे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदानकेंद्राच्या खोलीत नेले. या वेळी मतदानप्रक्रिया संपलेली होती.
हल्ल्यावेळी एक तास वीज गायब
जवळपास एक तास या वेळी वीज गायब झाल्याने राजळे यांना काही काळ अंधारात बसावे लागले. दरम्यान या घटनेची माहित कळताच काही राजळे समर्थक शिरसाठवाडी कडे निघाले होते मात्र पोलिसांनी रस्त्यामध्ये अडवला कार्यकर्त्यांनी रस्त्यामध्येच रस्ता रोको सुरू केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.