पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करून पतीला अग्नी दिलेली चिता विझवण्यास भाग पाडलं. उत्तर प्रदेशातल्या गाजीपूर इथली ही घटना आहे. आपापसांतल्या वादांमुळे गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नी वेगळे राहत होते.
पतीला सासरच्यांनी विष देऊन मारलं असा आरोप पत्नीनं केल्यामुळे पोलिसांनी कारवाई करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर या प्रकरणातलं सत्य उघड झालं. गाजीपूर पोलीस ठाण्याच्या फुल्लनपूर भागात साधारण दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. अमित नावाच्या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर कुटुंबीयांनी हिंदू रिवाजाप्रमाणे अंत्यविधी केले. मृतदेह सरणावर ठेवला आणि अग्नीही दिला. तेवढ्यात मृत अमितची पत्नी मनीषा तिथे पोलिसांसह दाखल झाली. पोलिसांनी अग्नी विझवून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
अमित आणि मनीषा यांचं काही काळापूर्वी लग्न झालं होतं; मात्र त्यांच्यात वाद निर्माण झाले होते. त्यामुळे ते दोघंही वेगवेगळे राहत होते. त्यांनी घटस्फोटासाठी अर्जही केला होता. त्यानंतर अमित मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. साधारण दहा-बारा दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. रीतीनुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय मृतदेह स्मशानभूमीत घेऊन गेले.
पत्नीला याची माहिती मिळताच ती पोलिसांना घेऊन स्मशानभूमीत दाखल झाली. सासरच्या मंडळींनी अमितला विष देऊन मारल्याचा तिनं आरोप केला. त्यामुळे पोलिसांनी लगेचच कारवाई करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
पत्नीने सासरच्यांवर गंभीर आरोप केल्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागली. शवविच्छेदन अहवालातून सत्य उघड होण्याची वाट सर्व जण पाहत होते. तो अहवाल आल्यावर मात्र पत्नीचा आरोप बिनबुडाचा असल्याचं स्पष्ट झालं. अमितचा मृत्यू विष दिल्यानं झाला नसल्याची माहिती प्रभारी अधिकारी दीनदयाल पांडे यांनी दिली. पत्नी आपल्या पतीला विष देऊन मारण्यात आल्याचा आरोप मनीषा यांनी सासरच्यांवर केला होता. त्यामुळेच ताबडतोब मृतदेह ताब्यात घेण्यात आला; मात्र मृतदेहावर कोणतेही व्रण, जखमा नसून, मृत्यू विषबाधेने झाल्याचा पुरावा आढळला नसल्याचं त्यानी सांगितलं.
त्यामुळे मनीषा यांचे आरोप चुकीचे असून त्याबाबत कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई केली, मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. पत्नीनं अशा पद्धतीनं आरोप का केले, याबाबत काही माहिती मिळू शकली नाही; मात्र पत्नीने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं शवविच्छेदन अहवालामुळे स्पष्ट झालं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.