आधी दुचाकी मग मिनी बसला ट्रकची धडक; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, 15 जखमी
सोलापूर : आधी दुचाकीला धडक दिली, त्यानंतर विरुद्ध दिशेला (राँग-वे) जाऊन मिनी बसला ट्रक धडकल्याची धक्कादायक घटना सोलापूर-पुणे महामार्गावर घडली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तिघाचा मृत्यू झाला असून, 15 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-पुणे महामार्गावरील कोळेवाडी येथे हा अपघात घडला. या अपघातामध्ये देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला. कोळेवाडी येथील रस्त्यावर एका कंटेनरची दुचाकीशी धडक झाली. त्यानंतर हा कंटेनर राँग साईडला गेला आणि मिनी बसला जाऊन धडकला. कंटेनर वेगात असल्यामुळे त्याची धडक बसताच मिनी बस जागीच पलटी झाली. त्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर मिनी बसमधील जखमी प्रवाशांना बाजूला काढण्यात आलं. त्यानंतर तातडीने या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताची चौकशी केली. यावेळी अपघातग्रस्त मिनी बस ही भाविकांना घेऊन पंढरपूर आणि तुळजापूरला भवानी देवीच्या दर्शनाला जात असल्याचं समजलं. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. पोलिसांनी घटनास्थळी येत क्रेनच्या साह्याने पलटी झालेली मिनीबस बाजूला केली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात कंटेनरला धडकलेला दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.