महापालिकेतील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही
सांगली: महापालिकेत खालच्या पातळीवरील भ्रष्टाचार कमी झाला आहे. पण वरच्या पातळीवर भ्रष्टाचार होत आहे. पालिकेतील भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला. दरम्यान, वसंतदादा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
महापालिकेच्या स्थापनेला २७वर्षे पूर्ण झाली तरी नागरी प्रश्न सुटलेले नाहीत. अधिकाऱ्यांवर टक्केवारीचा आरोप होत आहे. याबाबत विचारता पाटील म्हणाले की, महापालिकेला आयएएस अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचार थांबला पाहिजे. सध्या वरच्या पातळीवर भ्रष्टाचार सुरू आहे. कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. घरपट्टी वाढीबद्दल रोष आहे. आयुक्तांनी वाढीव बिले न देण्याचा शब्द दिला आहे. घरपट्टीबाबत शहरातील दोन्ही आमदारांना सोबत घेऊन पालकमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. वारणा योजना, रस्ते असे प्रश्न आजही सुटलेले नाहीत.
वसंतदादा कारखाना निवडणुकीबाबत पाटील म्हणाले की, हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला आहे. अजून तीन हंगाम बाकी आहेत. कर्जमुक्तीकडे कारखान्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कारखान्यावर निवडणूक खर्चाचा बोजा पडू नये, अशी इच्छा आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, चांगले संचालक असावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या १५ व १६ रोजी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन सक्षम पॅनेल तयार करणार असल्याचे सांगितले. जनतेची फसवणूक करून राज्यात भाजपचा राजकीय प्रवास सुरू आहे. राजकीय वैर बाजूला ठेवून साऱ्यांनी एकत्र यावे. विलासराव जगताप यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. विरोधकांचे नेतृत्व करण्यासाठी विश्वजित कदम व जयंत पाटील यांनी पुढाकार घ्यावा, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँक अध्यक्षाबाबत गुगली
तीन वर्षानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला होता. याबाबत विचारता खा. पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेत महाआघाडीची सत्ता आहे. पण आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. काहीजण शिंदे गटासोबत, तर काहीजण अजितदादांसोबत गेले आहेत. सध्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी तीन वर्षात चांगले काम केले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाबाबत प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या दाव्यातील हवा काढून घेतली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.