Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :- 162 एकरात जैन संस्कृतीला समर्पित प्रेरणातीर्थ! देशाच्या शिरपेचात झळाळून उठणारं संग्रहालय

पुणे :- 162 एकरात जैन संस्कृतीला समर्पित प्रेरणातीर्थ! देशाच्या शिरपेचात झळाळून उठणारं संग्रहालय
 

मानवाचा आत्मिक विकास हा भगवान महावीरांच्या चिंतनाचा विषय होता. याच चिंतनातून आणि त्यातून ओसंडलेल्या तत्त्वज्ञानातून त्यांनी एक प्रकाशवाट निर्माण केली आणि त्या प्रकाशवाटेवर चालणे ही साधकांसाठी एक आनंदानुभूती बनली. यातूनच जैन तत्त्वज्ञान आणि भारतीय जैन परंपरेचा एक सांस्कृतिक वारसा निर्माण झाला. या वारशाला समर्पित असलेले भव्य दिव्य असे 'अभय प्रभावना संग्रहालय' पुण्याजवळील वडगाव मावळ तालुक्यात तळेगावलगत पारवाडी येथे साकारले आहे. देशाच्या शिरपेचात झळाळून उठणारे हे संग्रहालय हा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठीच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे. हे ज्ञान केंद्र जैनधर्मीय आणि तमाम भारतीयांसाठी प्राचीन इतिहासाविषयीचे अभ्यासस्थान आणि प्रेरणास्थान ठरू शकते.


संग्रहालयाची स्थापना आणि उद्देश
या संग्रहालयाची स्थापना 'अमर प्रेरणा ट्रस्ट'चे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध उद्योगपती अभय फिरोदिया यांनी केली असून, नुकतेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे समारंभपूर्वक लोकार्पण झाले. भारतीय मूल्यप्रणाली आणि जैन धर्माच्या मूलभूत तत्त्वांची सखोल समज निर्माण करणे, हा या संग्रहालयाचा उद्देश आहे. देश-विदेशातील जिज्ञासूंना जैन परंपरेची प्राचीनता आणि भारतीय संस्कृतीतील तिचे अमूल्य योगदान येथे अनुभवता येईल. भारतीय संस्कृतीत ज्ञान आणि संस्कार यांचा संगम तर आहेच; पण जीवनमूल्ये आणि मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीही आहे. ती आत्मसात केल्यास मानवी जीवन अधिक सुखमय होऊ शकते. हेच शिकवण्याचे कार्य हे संग्रहालय करणार आहे.
श्रमण परंपरा आणि नैतिकता

श्रमण आणि जैन परंपरेचे सखोल मूल्य हजारो वर्षांपासून भारताच्या नैतिक आणि सांस्कृतिक गाभ्यात रुजले आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून शिक्षण, व्यावसायिकता आणि नीतिमत्तेची तत्वे सामाजिक मूल्ये म्हणून प्रतिबिंबित होतात आणि संतुलित आणि उद्देशपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शक ठरतात. जैन धर्माच्या प्रकाशाने भारतीय संस्कृती समृद्ध झाली आहे. जैन धर्माची महानता केवळ जैन आचार्यांनी लिहिलेल्या प्राकृत भाषेतील हजारो ग्रंथांपुरती मर्यादित नाही, तर त्यातील तत्त्वज्ञानाने देशावर टाकलेल्या अमिट प्रभावात आहे. याच विचारांवर उभे राहिलेले हे संग्रहालय केवळ जैन धर्मीयांसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही एक दिशादर्शक जीवनदर्शन ठरेल.




जैन धर्माचा वारसा
श्रमण संस्कृतीतून निर्माण झालेले जैन आणि बौद्ध हे प्राचीन धर्म आहेत. जैन धर्माची शिकवण ही अहिंसेची आहे. त्याग, समर्पण, आस्था, प्रेम या जीवनमूल्यांची शिकवण जैन धर्माकडून जगाला मिळते. आता या संग्रहालयामुळे सर्वांना या ठिकाणी येऊन या धर्माविषयी जाणून घेता येईल. जैन धर्मांची जीवनपद्धती कशी आहे आणि त्यांची जीवनमूल्ये काय आहेत, त्याची विस्तारित माहिती या संग्रहालयात पाहायला मिळेल. फिरोदिया यांनी हे संग्रहालय आजच्या पिढीला प्रेरणा देईल अशा प्रकारे बनवले आहे. येथे येऊन मनामध्ये पावित्र्य भरून जाते. संग्रहालयात येऊन चांगली जीवनमूल्ये आत्मसात करून प्रत्येकजण येथून बाहेर पडतो. 

संग्रहालयात जैन धर्माचे पहिले तीर्थकार ऋषभदेव यांची भव्य मूर्ती साकारली गेली आहे. ती मूर्ती पाहून प्रत्येकाच्या मनात अहिंसेचा संदेश आपोआप सामावून जातो. जवळच जैन धर्माची एक अतिशय जुनी लेणी देखील आहे. या स्थळामुळे त्या लेण्यांचा इतिहासदेखील सर्वांसमोर येईल. जैन धर्माचे भारतीय संस्कृतीमध्ये असलेले मोठे योगदान आपल्याला विसरता येणार नाही. 'अभय प्रभावना संग्रहालय' केवळ जैन धर्मीयांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच एक प्रेरणास्थळ आणि तीर्थस्थळ ठरेल. जैन संस्कृती आणि भारतीय जीवनमूल्ये यांचे दर्शन घडवणारे 'अभय प्रभावना संग्रहालय' हा एक अमूल्य ठेवा आहे. हे केवळ धार्मिक वा सांस्कृतिक स्थळ नसून, एक प्रेरणास्थान आहे, जे जीवनाच्या मूल्याधारित प्रवासाला दिशा देईल. येथे भेट दिल्यावर प्रत्येकजण जीवनाकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहू लागतो आणि सद्गुण आत्मसात करण्यासाठी प्रेरित होतो. हे संग्रहालय नक्कीच आधुनिक भारताच्या नैतिकतेचे आणि संस्कृतीचे एक अनमोल प्रतीक ठरेल!
कसे आहे संग्रहालय ?

इंद्रायणी नदीच्या निसर्गरम्य काठावर वसलेले हे 'अभय प्रभावना संग्रहालय' संग्रहालय ३.५ लाख चौरस फूट क्युरेटेड आणि वातानुकूलित जागेत पसरलेले असून, अभ्यागतांना जैन धर्माच्या शिकवणींद्वारे भारतीय मूल्यांबद्दल माहिती देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या संग्रहालयात ३५० पेक्षा अधिक अद्वितीय कलाकृतींसह ३० विशेष डिझाइन केलेल्या गॅलरी आहेत, ज्यातून सामाजिक स्तरावर सुरक्षा, उत्पादकता, समृद्धी आणि वैयक्तिक स्तरावर करुणा, मुक्त विचारसरणी आणि नैतिक जीवन या जैन मूल्यांचे सार सादर केले गेले आहेत. 

तब्बल ५० एकर जागेवर पसरलेले हे संग्रहालय हाय-टेक ऑडिओ-व्हिज्युअल्स, ॲनिमेशन, व्हर्च्युअल रिॲलिटी, नयनरम्य अनुभव आणि परस्परसंवादी प्रणालीने समृद्ध आहे. जैन तत्त्वज्ञानातील जटिल आणि आध्यात्मिक संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी ३५० हून अधिक कलाकृती, शिल्पे, आणि भव्य प्रतिकृती येथे तयार केल्या आहेत.

संग्रहालय दृष्टिक्षेपात 
१६२ एकरांवर सुंदर परिसर

२० एकरांवर लॅन्डस्केपची अनुभूती

१५,००० चौरस फूट मुलांसाठी इनडोअर संग्रहालय

३३,००० चौरस फूट परिसर मुलांच्या खेळण्यासाठी

दररोज २ हजार लोकांची राहण्याची क्षमता

५०० हून अधिक लोकांसाठी फूड कोर्ट

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.