बारावीची उद्यापासून परीक्षा! परीक्षेतील हालचाली टिपण्यासाठी सुरू
राहणार पर्यवेक्षकांचे मोबाईल कॅमेरे; जिल्हाधिकारी कार्यालयात असणार
कंट्रोल रूम
सोलापूर : इयत्ता बारावीची उद्यापासून (मंगळवार, ता. ११) परीक्षा सुरू होणार असून जिल्ह्यातील १२४ केंद्रांवर ५५ हजार ८८२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून प्रत्येक परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षकांकडील मोबाईलचे कॅमेरे सुरू ठेवले जाणार आहेत.
त्यांच्या वर्गातील प्रत्येक हालचालीवर जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयातील कंट्रोल रूममधून लक्ष ठेवणार आहेत. मागच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील एका केंद्रावरील विद्यार्थिनीने तिच्या बोर्डाच्या पेपरमध्ये तिच्या केंद्रावर चालणाऱ्या कॉपी व उत्तरे सांगण्याच्या प्रकाराबद्दल सविस्तर लिहिले होते. पेपर तपासणाऱ्या शिक्षकाने तो पेपर बोर्डाकडे दिला होता. त्यामुळे बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी ठोस पाऊल उचलले. सीसीटीव्ही कॅमेरे बहुतेक शाळा-महाविद्यालयांवर नसल्याने २०१८ पासून कॉपी प्रकार आढळलेल्या केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक बदलण्याचा निर्णय घेतला. त्यात सोलापूर जिल्ह्यातील २२ परीक्षा केंद्रे आहेत.
याशिवाय कॉपीसारखा गैरप्रकार आढळून आल्यास आता संबंधित विद्यार्थ्यासह तेथील केंद्र संचालक, पर्यवेक्षकाविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील बोर्डाने दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षा हॉलमध्ये जातानाच अंगझडती घेऊन तपासून आत सोडले जाणार असून मुलींच्या तपासणीसाठी स्वतंत्र महिला कर्मचारी नेमले जाणार आहेत. याशिवाय प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकाची नजर असणार आहे. केंद्रावरील हालचाली टिपण्यासाठी व्हिडिओग्राफर देखील असणार आहे. एका परीक्षा हॉलमध्ये २५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील स्थिती
एकूण विद्यार्थी५५,८८२परीक्षा केंद्रे१२४विशेष लक्ष असणारे केंद्र२२भरारी पथके७
जिल्हाधिकारी कार्यालयात असेल कंट्रोल रुम
दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. परीक्षा केंद्रांवरील हालचाली टिपण्यासाठी प्रत्येकी दोन व्हिडिओग्राफर नेमले जातील. परीक्षा हॉलमध्ये नियुक्त पर्यवेक्षकांच्या मोबाईल कॅमेऱ्यातून प्रत्येक हालचाल टिपली जाणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोल रूम तयार केली जाणार आहे.
- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर
'झूम'वर जॉईन असतील पर्यवेक्षक
परीक्षा सुरू झाल्यापासून त्या विषयाचा पेपर सुटेपर्यंत पर्यवेक्षकाच्या मोबाईलचे कॅमेरे सुरू राहतील. त्यांना झूम कॉलच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. त्या सर्वांची विशेषत: वर्गातील प्रत्येक हालचाल जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातील कंट्रोल रूममधून समजणार आहे. त्यामुळे अनेक केंद्रांवरील नेहमीची वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगण्याच्या प्रकाराला आळा बसेल, असे बोलले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.