भररस्त्यात तरुणाला कमरेच्या पट्ट्याने मारहाण; पुण्यात मारणे टोळीचा धुडगूस
पुण्यातील कोथरूड परिसरात भरदिवसा एका तरुणाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 'पुण्याचे मालक' अशा आशयाचे रील समाज माध्यमांवर प्रसारित करून दहशत निर्माण करणाऱ्या मारणे टोळीतील गुंडांनी हे कृत्य केले आहे. विनाकारण, भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण करण्यात आली. देवेंद्र जोग (वय ३३, रा. कोथरूड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी (19 फेब्रुवारी) सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास कोथरूडमधील भेलकेनगर चौकात ही घटना घडली. या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र एका आयटी कंपनीत नोकरी करतो. शिवजयंतीनिमित्त सुट्टी असल्याने तो घरीच होता. दुपारी वैयक्तिक कामानिमित्त तो दुचाकीवरून भेलकेनगर परिसरात गेला होता. काम आटोपून परतत असताना, भेलकेनगर चौकातून 'मारणे टोळी'ची मिरवणूक निघाली होती. देवेंद्र मिरवणुकीसमोरून दुचाकी घेऊन पुढे गेला. याच कारणावरून टोळीतील तीन ते चार जणांनी देवेंद्रला थांबवून, 'गाडी हळू चालवता येत नाही का?' असे म्हणत शिवीगाळ केली आणि मारहाण सुरू केली. एकाने तर त्याच्या नाकावर ठोसा मारला. त्यानंतर त्याला रस्त्यावर पाडून लाथा-बुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यात आली.
मारहाण केल्यानंतर टोळके पळून गेले. देवेंद्रने वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर, कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले की, 'आरोपींवर कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.' कोथरूड परिसरात सक्रिय असलेल्या गुंडांच्या टोळ्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 'शहरात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी,' अशी मागणी जोर धरू लागली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.