आज अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे ट्वीट करत सांगितले आहे.
याप्रकरणी आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती माध्यमांना दिली. पण सभागृहाला दिली नाही. मागील अधिवेशनात नागपुरात जे काही बोलले ते खोट होते. गृहखात्याकडे ही माहिती नव्हती का? ती माहिती गृहखात्याने का लपवली,” असा संतप्त सवाल पटोले यांनी उपस्थित केला.
“राज्य सरकार संतोष देशमुख प्रकरणात गुन्हेगाराला वाचवण्याचं काम करत होते. हे सरकार देखील सहआरोपी आहे. या सरकारला हिशोब द्यावा लागेल. मुंडेंचा राजीनामा लपवता यावा, विरोधकांकडून विचारणा होऊ नये म्हणून आजचं कामकाज बंद पाडले,” असेही पटोले यांनी स्पष्ट केले.“फडणवीस रात्री ताफा घेऊन अजित पवारांना भेटायला जातात. धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतात. राजीनामा आल्यानंतर माध्यमांना सांगतात. पण नियमानुसार फडणवीसांनी सभागृहाला त्याबाबत सांगणं अपेक्षित होतं. त्यामुळे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार आहोत,” असे नाना पटोले यांनी सांगितले. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये गदारोळ पाहायला मिळू शकतो. पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पाहायला मिळेल, यात काही शंकाच नाही. यावर फडणवीस काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.