चंद्रपूर शहरातील पठाणपुरा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका टोळक्याने दोन पोलिसांवर धारदार चाकुने सपासप वार केले आहेत. या हल्ल्यात एका पोलिसाचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला आहे. तर दुसरा आरोपी गंभीररित्या जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा खून झाल्यानंतर आरोपीनं स्वतः पोलीस ठाण्यात सरेंडर केल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दिलीप चव्हाण आणि संदीप चाफले असं टोळक्यानं हल्ला केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे. घटनेच्या दिवशी ७मार्चला रात्री दोघंही चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या आणि बदनाम गल्ली म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या पठाणपुरा भागातील पींक पॅराडाईज बारमध्ये बसले होते. हा परिसर विविध अवैध कृत्यांसाठी बदनाम आहे. दोघे बारमध्ये बसले असताना त्यांचा बारमध्ये एका युवकाशी वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संबंधित तरुण आणि दोन पोलीस कर्मचारी यांच्या बाचाबाची आणि मारहाण झाली.हा राग अनावर झाल्यानंतर संबंधित तरुण आपल्या आणखी काही साथीदारांना घेऊन बारमध्ये आला आणि त्याने टोळक्याच्या मदतीने दोन्ही पोलिसांना बेदम मारहाण केली. तसेच चाकुने वार करत दोन्ही पोलिसांना रक्तबंबाळ केलं. या हल्ल्यात दिलीप चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप चाफले हे गंभीर जखमी झाले. चाफले यांच्यावर खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.