पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू
इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये हिंदू समुदाय हा सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्याक गट आहे, ज्यांची लोकसंख्या सुमारे 52 लाख (2.17%) आहे. यातील बहुतांश हिंदू हे सिंध प्रांतात (सुमारे 49 लाख) राहतात. पाकिस्तानमधून अल्पसंख्याकांची स्थिती काय आहे हे तर जगजाहीरच आहे, पण एका व्यक्तीने स्वकर्तृत्वावर तेथील विपरित परिस्थितीवर मात करून स्वतःचे स्थान बनवले आहे. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू अशी या माणसाची एक ओळख आहे. माणूस म्हणजे फॅशन डिझायनर दीपक परवानी.
दीपक परवानी यांचा जन्म 1974 मध्ये पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मीरपूर खास येथे एका सिंधी हिंदू कुटुंबात झाला. 1996 मध्ये त्यांनी फॅशन इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि स्वतःचा 'डीपी' (दीपक परवानी) हा ब ंड सुरू केला. त्यांच्या ब-डने विशेषतः बायडल आणि फॉर्मल वेअर डिझाइनमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अप्रतिम डिझायनिंगमुळे त्यांना अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली आणि त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. 2014 मध्ये, दीपक परवानी यांना बुल्गारियन फॅशन अवॉर्डस्मध्ये जगातील सहाव्या सर्वोत्तम फॅशन डिझायनर म्हणून निवडण्यात आले. त्यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात मोठा कुर्ता बनवण्याचा विक्रमही केला आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना पाकिस्तानातील सांस्कृतिक राजदूत म्हणून चीन आणि मलेशियामध्ये सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या यशाची मर्यादा फक्त पाकिस्तानपर्यंतच मर्यादित नाही. त्यांनी प्रसिद्ध भारतीय गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबतही काम केले आहे.
फॅशन इंडस्ट्रीमध्ये दीपक परवानी हे केवळ एक नाव नसून, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व देखील आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 2022 मध्ये दीपक परवानी यांची एकूण संपत्ती सुमारे 71 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या चुलत भावाला, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्नूकर खेळाडू नाविन परवानी यांना देखील मोठे यश मिळाले असून, त्यांची संपत्ती सुमारे 60 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. दीपक परवानी यांनी फॅशन, कला आणि व्यवसायात भरीव योगदान दिले असून, पाकिस्तानातील हिंदू समुदायासाठी ते प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.