सध्या सगळीकडे कौतुक होतंय ते आयपीएसची परीक्षा पास झालेल्या बिरदेव ढोणे यांचं. मेंढपाळांच्या कुटूंबातून आलेले बिरदेव ढोणे यांनी कष्टाच्या जोरावर आयपीएस पदाला गवसणी घातलीय. युपीएससीच्या निकालानंतर बिरदेव
यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यातच बिरदेव यांनी केलेल्या आवाहनाला
आता बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने साद घालत त्यांना खास भेट दिली.
शिक्षणाचा गंध नसलेल्या घरातून आलेल्या बिरदेव ढोणे यांना त्यांच्या प्रवासात अनेकांनी मदत केली. त्यामुळे जेव्हा त्यांचा सत्कार होतोय तेव्हा मला बुके नकोत तर बुकं द्या असं आवाहन केलं. या पुस्तकांमधून त्यांना गावात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय तयार करायचं आहे. त्यांचा या आवाहनाला प्रतिसाद देत बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाने 1000 पुस्तकं पाठवली.
शिखर पहारिया संस्थेकडून बिरदेव यांच्या गावी 1000 पुस्तकांची भेट पाठवण्यात आली. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे सगळीकडे शिखरच्या कृतीचं कौतुक होतंय. शिखर सध्या राजकारणातही सक्रिय झालेला पाहायला मिळतोय. सोलापूरच्या अनेक सभांमध्ये तो आजोबा सुशीलकुमार शिंदे आणि मावशी प्रणिती शिंदे यांच्याबरोबर हजेरी लावत असतो.बिरदेव यांनी दहावीला 96 टक्के गुण मिळवत मुरगूड केंद्रात क्रमांक मिळवला होता. बारावीतही त्यांनी 89% गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवला. त्यानंतर पुण्यातील सीओईपीमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. यादरम्यान पोस्टात नोकरी आणि इतर नोकरी करत यूपीएससीची तयारी केली. आता अभूतपूर्व यश मिळवत आयपीएसच्या पदवीला गवसणी घातली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.