सांगली : हरवलेले आजोबा अन् आजीची घालमेलः एसटी कर्मचाऱ्यांची तत्परता दाखवत मदत; सांगली स्थानकातील प्रकार
सांगली : आजोबा एकीकडे अन् आजी दुसरीकडे. या दोन जीवांची घालमेल येथील बसस्थानकावर पाहायला मिळाली. एसटीचे सुरक्षारक्षक व वाहतूक नियंत्रकांनी तत्परता दाखवत बसस्थानकावर हरवलेल्या आजोबांची आजीशी भेट घडवून आणली आणि आजोबांना पाहताच आजीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. सोमवारी (ता. ७) दुपारची दोनची वेळ. उन्हाचा पारा चढलेला. इंगुळ (ता. शिराळा) येथील ८० पार तुकाराम व शांताबाई गायकवाड वृद्ध आजी-आजोबा पंढरपूरला चैत्री वारीला गेलेले. दर्शन करून गावाकडे परतत होते. बसस्थानकावर ते उतरले. आजीकडे बांधलेले पोते, त्यात काही सामान. हातात आणखी दोन पिशव्या. स्थानकात आल्यावर डोक्यावरील सामान खाली ठेवले. मागे पाहते तर पती दिसेनासे झाले.
पाच मिनिटे थांबून पुन्हा पाहिले, तर ते दिसेनातच. आजीने धीर एकटवून बसस्थानकावर उभे असलेल्या वाहतूक नियंत्रक व सुरक्षारक्षकांना आजोबा चुकल्याची कल्पना दिली. 'असतील इथेच कुठेतरी...' असे त्यांनी आजींना सांगितले. आजोबा सापडण्याची चिन्हे नव्हती. काही वेळ गेला. आजीने पुन्हा धीर धरून वाहतूक नियंत्रकांना 'तुम्ही माईकवरून तुकाराम गायकवाड हे नाव पुकारा...' असे सांगितले.मात्र आजोबांचा ठाव ठिकाणा लागेना. आता मात्र आजी उदास दिसू लागली. कनवटीला लावलेला एक कागद काढला. त्यावर नातवाचा मोबाईल नंबर होता. त्यांनी फोन करण्याची वाहतूक नियंत्रकांना विनंती केली. नातवाशी फोनवर बोलणे झाले. 'आजीला गाडीत बसवा. आजोबा येतील मागून,' असे त्याने वाहतूक नियंत्रकांना सांगितले. मात्र आजोबांशिवाय आजीचा पाय काही निघेना. आता तर बरोबर आले.
लगेच कुठे गेले? या एकाच विचारात आजी होती. वाहतूक नियंत्रक शामराव गावडे, सुरक्षारक्षक बाळासाहेब ठिगळे, सुशील कांबळे यांनी, 'बाजूलाच कोल्हापूरला जाणाऱ्या बसच्या स्थानकात आजोबा झोपलेले दिसले. आजीला तिकडे नेऊन हेच आहेत का,' असे विचारले. आजोबांना पाहताक्षणी आजीच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आजी सांगू लागल्या, "माझ्या सासऱ्यांची वारी गेली वीस वर्षे नित्य नेमाने सांभाळली. आता पतींचे वय झाले आहे. लक्षात राहत नाही. 'तुम्ही येऊ नका, मी जाते वारीला,' असे सांगत असतानाही ते वारीला आले."
दोघांना वाहतूक नियंत्रकांनी इस्लामपूरला जाणाऱ्या बसमध्ये बसविले. फोन करून नातवाला इस्लामपूर बसस्थानकावरून घरी घेऊन जाण्याची कल्पना दिली. आजीला गाडीत बसवले. थंड पाण्याची एक बाटली आजीच्या हाती दिली. आपल्या बरोबर कोणी नसताना एसटीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, प्रेमळपणा पाहून आजी भारवल्या. त्यांनी आभारासाठी नकळत हात जोडले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.