इस्लामपूर : राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या वाघवाडी फाट्यावर भर चौकात बुधवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याच्या सुमारास ३० वर्षीय युवकाचा बेसबॉलच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि डोक्यात मारहाण करत खून करण्यात आल्याची घटना घडली. नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध
ठेवल्याच्या रागातून हा प्रकार झाला. पोलिसांनी घटना समजताच गतीने तपास करत
अवघ्या १२ तासांत दोघा संशयितांना जेरबंद केले. दोघांनी खुनाची कबुली दिली
आहे.
सौरभ राजेंद्र केर्लेकर (वय-३०, रा. माळगल्ली, इस्लामपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी अरविंद उर्फ राघू सुभाष साटम (३२,रा. शिवनगर, इस्लामपूर), किरण रामचंद्र सातपुते (३५, मूळ रा.रे ड, ता. शिराळा,सध्या रा. संभुआप्पा मठाजवळ, इस्लामपूर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघांना उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. गणेश रामचंद्र केर्लेकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुख्य संशयित राघू साटम आणि किरण सातपुते हे दोघे ढाब्यावर काम करतात. तर मृत सौरभ हा राघूचा नातेवाईक असून तो रुग्णवाहिका चालक आणि डीजे ऑपरेटर म्हणून काम करत होता. सौरभचे आपल्या नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध आहेत यावरून राघू हा त्याच्यावर चिडून होता. त्याचा काटा काढायच्या उद्देशाने त्याला मंगळवारी रात्री उशिरा वाघवाडी फाट्यावरील ओपन जिमशेजारी असणाऱ्या अशोक ढाब्याजवळ बोलावून घेतले. तिथे राघू आणि सौरभ यांची वादावादी झाली.
त्यावेळी तिथे असणाऱ्या किरण याने सौरभला धरून ठेवले आणि रागाच्या भरात राघूने लाकडी बॅटचे फटके सौरभच्या तोंडावर आणि डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. मध्यरात्री ही मारहाण झाल्यावर सौरभ हा तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर राघू हा घरी आला तर किरण हा ढाब्यावर झोपी गेला. या कारवाईत सहायक निरीक्षक ज्योती सूर्यवंशी, हवालदार दीपक ठोंबरे, शशिकांत शिंदे, अमोल सावंत, दीपक घस्ते, विशाल पांगे, यशवंत कोळी, सचिन भंडारे, सायबरचे कॅप्टन गुंडेवाड, विवेक साळुंखे यांनी भाग घेतला.
पोलिसी खाक्या दाखवताच कबुली
बुधवारी सकाळी खुनाची घटना पोलिसांना समजल्यावर पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी पथकासह तेथे धाव घेत संशयितांची माहिती मिळवत त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली. दरम्यान, सौरभचा खून झाल्याचे समजताच राघू आणि किरण हे दोघे पळून जाण्याचा तयारीत असताना निरीक्षक हारुगडे यांनी पेठनाका परिसरात दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी घटनेची कबुली दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.