Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरसंघचालकपदी दलित, महिला कधी? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

सरसंघचालकपदी दलित, महिला कधी? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल


मुंबई:  काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष हे दलित समाजाचे आहेत पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी होणार, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. मोदींनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत सपकाळ म्हणाले की, मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत हास्यास्पद आहे, या विधानाचा मी जाहीर निषेध करतो. काँग्रेस पक्षाने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखित झालेले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात देशाने साक्षरतेपासून अंतराळापर्यंत प्रगती केलेली आहे.

 

मोदी हे ११ वर्षापासून सत्तेत आहेत, या ११ वर्षांत त्यांनी देशाचे काय भले केले, हे त्यांनी जाहीर करावे. मोदी यांनी हिंदू-मुस्लीम, दलित-सवर्ण-ओबीसी यांच्यात द्वेष निर्माण करण्याचेच काम केले आहे. तिहेरी तलाक, वक्फ बोर्ड सारखे मुद्दे उपस्थित करून मोदींनी मुस्लीम महिलांबद्दलची आपली खोटी तळमळ दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी गेल्या ११ वर्षांत एकाही मुस्लीम महिलेला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री केले नाही. एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात मुस्लीम आणि दलितांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यांची जमावाकडून हत्या (लिंचिंग) केली जात आहे. ते रोखण्यासाठी मोदींनी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांच्या कोरड्या भाषणबाजीला काही अर्थ नसल्याचे खडे बोल सपकाळ यांनी सुनावले.

 

डॉ. आंबेडकरांबद्दलचे संघ, भाजपचे प्रेम बेगडी
सपकाळ म्हणाले, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना किती प्रेम आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, याच विचाराच्या लोकांनी बाबासाहेबांचा सातत्याने अपमान केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला रा. स्व. संघ पहिल्यापासूनच मानत नाही. परंतु खोटा इतिहास सांगून दिशाभूल करणे ही संघाची शिकवण आहे, तेच मोदी करत आहेत. पण त्यांच्या अशा विधानाने खरा इतिहास झाकला जाणार नाही व संघ, भाजप व मोदींनी केलेली पापे धुवून निघणार नाहीत. प्रत्येक जाती-धर्माच्या व्यक्तीवर प्रेम असले पाहिजे हे संविधान सांगते, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही भारताची परंपरा आहे,' असेही त्यांनी सांगितले. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.