Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईतील जैन मंदीर पाडल्याप्रकरणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा... लढेंगे - जितेंगे - - मंदीर वही बनाऐंगे जैन समाजाचा निर्धार..

मुंबईतील जैन मंदीर पाडल्याप्रकरणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा... लढेंगे - जितेंगे - - मंदीर वही बनाऐंगे जैन समाजाचा निर्धार.. 


बेकायदेशीर मंदीर पाडणाऱ्या मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करुन सखोल चौकशी करण्याची एकमुखी मागणी...  या आक्रोश मोर्चात जैन समाजातील दिगंबर, श्वेतांबर, मूर्तीपूजक आणि स्थानकवासी संप्रदाय सहभागी...  पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना णमोकार मंत्राने श्रद्धांजली व भारत माता की जय चा निनाद...

सांगली दि.२४: विलेपार्ले पूर्व, मुंबई येथील नेमिनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारातील तीन दशकाहून अधिक जुने भ. पार्श्वनाथ दिगंबर जैन   मंदिरावर महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने तोड कारवाई केली. यामुळे भारतभर जैन धर्मीय व्यथित झाले आहेत. जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ आज (दि.२४)रोजी दक्षिण भारत जैन सभेच्या नेतृत्वाखाली सकल जैन समाजाच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य  आक्रोश  मोर्चा काढण्यात आला. यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण जैन आणि अहिंसा प्रेमी समाज , प्रत्येक गावातील जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त,जैन समाजाची मंडळे, संस्था सहभागी झाल्या होत्या.

सकाळी १०वा विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आक्रोश मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामीजी,आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मा. भालचंद्र पाटील, चेअरमन मा. रावसाहेब जिनगोंडा पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे,सहखजिनदार अरविंद मजलेकर, माजी चेअरमन सागर चौगुले,महामंत्री प्रा. एन.डी.बिरनाळे हे होते.यावेळी खासदार विशालदादा पाटील, आमदार सदाभाऊ खोत पृथ्वीराजबाबा पाटील, सिध्दार्थ गाडगीळ, व विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते  सहभागी झाले होते. या आक्रोश मोर्चात जैन समाजाचा ५०० फूटी भव्य पंचरंगी ध्वजाने सांगलीकरांचे लक्ष वेधले.

या आक्रोश मोर्चात लढेंगे - जितेंगे - मंदीर वही बनाऐंगे, जैन मंदीर पाडलेल्या महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, संबंधित मुंबई महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा, नही चलेगी नही चलेगी - दादागिरी नही चलेगी, होते त्याच ठिकाणी जैन मंदीर झालेच पाहिजे, जैन समाजावर अन्याय करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, हम कम है लेकीन कायर नही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.जैन महिला परिषद, वीर सेवा दल,जैन पदवीधर संघटना, जैन बोर्डिंग व दक्षिण भारत जैन सभा आणि सकल जैन समाजाच्या कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने जैन मंदीर पाडणाऱ्या मुंबई महापालिकेचा जोरदार घोषणाबाजी करीत निषेध करत होते. 
विरोध असतानाही महानगरपालिका 'के' पूर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांनी कोणताही विचार न करता आदेश काढल्याचा आरोपही सकल जैन समाज व दक्षिण भारत जैन सभेने आणि जैन धर्मियांनी केला आहे. जैन धर्मियांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घाडगे यांच्यावर निलंबनाची कारवाईची करावी, जैन मंदिर पुन्हा बांधून देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व आयुक्तसो बृहन्मुंबई महापालिका यांना उद्देशून सांगलीचे जिल्हाधिकारी यांना आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, डॉ. अजित पाटील व सकल जैन समाज पदाधिकारी यांनी सादर केले व तातडीने कार्यवाही करण्याची शासनास शिफारस करण्यात यावी अशी मागणी केली.

या मोर्चात दिगंबर, श्वेतांबर व जैन समाजाच्या सर्व पंथीय समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाला होता. प्रचंड जैन जनसागर उसळला होता. आक्रोश मोर्चाचे कलेक्टर ऑफिससमोर सभेत रुपांतर झाले. सुरुवातीला पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना णमोकार मंत्राने श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, 'मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी न्यायप्रविष्ट बाब असताना घाईघाईत कोणाच्या तरी हितासाठी जैन मंदीर उध्वस्त केले. ओपन स्पेस विकत घेऊन ३२ वर्षापूर्वी भगवान पार्श्वनाथ मंदीर बांधून जैन समाज उपासना करत आला आहे. मंदीर त्याच जागेवर होईपर्यंत जैन समाज शांत बसणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन न्याय मिळवून देऊ. प्रसंगी मुंबईत धडक मारु. '

दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील म्हणाले,' जैन समाज शांतीप्रेमी व अहिंसक आहे. तो कायर नाही. जैन समाजाने दाखवलेली एकी ही दक्षिण भारत जैन सभेची ताकद आहे. सभेला ताकद म्हणजे जैन समाजाला ताकद दिली आहे. भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महाराज व आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत केलेला जैन समाजाचा आक्रोश न्याय मिळवून देणारा आहे.जैन समाजावरील अन्यायाविरुद्ध सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.  चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले,'  या आक्रोश मोर्चात सकल जैन समाज सहभागी आहे. मराठा, लिंगायत, मुस्लिम समाज व बहुजन समाजातील लोकांचा पाठिंबा आहे. 

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले,' जैन समाज अहिंसक व शांतता प्रिय आहे. तो आतंकवादी नाही. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व आम्ही तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना शिष्टमंडळाने भेटून कैफियत मांडू व आहे त्याच ठिकाणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदीर बांधण्याची व्यवस्था करु.'  यावेळी श्वेतांबर जैन समाजाचे रोहन मेहता यांनी आहे त्याच ठिकाणी मंदीर झाले पाहिजे यासाठी व ज्या ज्या वेळी जैन समाजावर अन्याय होत राहील त्यावेळी श्वेतांबर पंथीयांचा संपूर्ण पाठिंबा राहील असे सांगितले.  मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी न्याय मिळेपर्यंत हा लढा चालूच राहील. आपले ऐक्य यश मिळवणारच असे सांगितले. यावेळी अर्चना गाट, शेतकरी संघटनेचे राजोबा यांनी मनोगते व्यक्त केली. 

भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामीजी म्हणाले,'जैन मंदीर पाडण्याचा अधिकार कोणालाही नाही. घाईघाईत सकाळी मंदीर पाडण्यात कांहीतरी काळेबेरे आहे. भ. आदिनाथ व भ. पार्श्वनाथ हे आमचे शासक आहेत. जैन मंदीर आहे त्याच ठिकाणी झाले पाहिजे तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आपल्या अनेक मंदीरे, साधूवर, तीर्थक्षेत्रावर आघात होत आहेत हे सहन केले जाणार नाही. 
जैन समाजाचा हा आक्रोश मोर्चा एवढा प्रचंड मोठा होता की विश्रामबाग पासून कलेक्टर ऑफिसपर्यंत वहातूक खोळंबली होती. कोणताही अनुचित प्रकार न करता शांततेत व शिस्तबद्धपणे निघालेल्या हा आक्रोश मोर्चा जैन समाजाचा न्यायासाठी सविनय आक्रोश होता. या मोर्चात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावातील १५ हजाराहून अधिक जैन समाज   उपस्थित होता. आभार दक्षिण भारत जैन सभेचे महामंत्री प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी मानले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.