PNB घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक; भारताच्या विनंतीवरून कारवाई: रिपोर्ट्स
सुमारे २ अब्ज डॉलर्सच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या विनंतीवरून ही अटक करण्यात आली आहे. मेहुल चोक्सी २०२१ च्या अखेरीस अँटिग्वामधून पळून गेला होता, त्यानंतर भारतीय तपास यंत्रणा दोन महिने बेल्जियमच्या एजन्सींच्या संपर्कात होत्या.
बऱ्याच काळापासून भारतीय तपास यंत्रणा चोक्सीचा शोध घेत होत्या. माहिती असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो सध्या बेल्जियममध्ये तुरुंगात आहे. भारतीय तपास यंत्रणा चोक्सीच्या मागावर होत्या. चोक्सी बेल्जियममध्ये असल्याचे तपास यंत्रणांना समजले तेव्हा तेव्हा त्यांनी ताबडतोब तिथल्या सरकारला औपचारिक पत्र पाठवून त्याला अटक आणि प्रत्यार्पणाची मागणी केली. प्रत्युत्तरादाखल, बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या दोन अटक वॉरंटच्या आधारे चोक्सीला ताब्यात घेतले. हे वॉरंट २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी करण्यात आले होते.
भारतात का आला नव्हता चोक्सी?
अँटिग्वामध्ये वास्तव्यास असलेला मेहुल चोक्सी उपचारासाठी युरोपला आला होता. त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे की, तो गंभीर आजाराने ग्रस्त आहे आणि बेल्जियमच्या न्यायालयात जामीन मागणार आहे. मेहुल चोक्सीला रक्त कर्करोग (क्रॉनिक लिम्फोसाइटिक ल्युकेमिया आणि लिम्फोमा) असल्याचे कारण देत त्याने यापूर्वी मुंबईतील एका न्यायालयात भारतात प्रवास करण्यास असमर्थता व्यक्त केली होती.
CBI, ED चोक्सीविरोधात आक्रमक
दोन्ही भारतीय एजन्सी, सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) बेल्जियमच्या न्यायालयात चोक्सीच्या जामिनाला विरोध करतील आणि त्याच्या प्रत्यार्पणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. एजन्सींचा आरोप आहे की चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांनी बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून पीएनबीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.