"चूक मान्य करुन माफी मागा"; महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरुन सदावर्तेचे उदयनराजेंना प्रत्युत्तर
दोन दिवसांपूर्वी महात्मा जोतीराव फुले यांची १९८ वी जयंती पार पडली. यावेळी महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यातील फुले वाड्याला भेट दिली होती. यावेळी महात्मा फुलेंच्या कार्याबाबत उदयनराजे भोसले यांनी एक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरुन नव्या वादाला तोंड फुटलं. काँग्रेससह ओबीसी नेत्यांनी उदयनराजेंच्या या विधानावरुन प्रतिक्रिया दिली. आता सातत्याने आपल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजेंना प्रत्युत्तर दिले आहे. उदयनराजेंनी समोर येऊन खुलासा करायला हवा असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
जयंतीनिमित्ताने महात्मा फुले यांच्या कार्याचा उल्लेख कर थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्त्री शिक्षणाची मूहुर्तमेढ रोवली असा दावा उदयनराजेंनी केला होता. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी थोरले प्रतापसिंह महाराजांचे अनुकरण केले होते, असं उदयनराजे भोसले म्हणाले. यावरुन आता गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. अभ्यास करावा लागतो, इतिहास वाचावा लागतो, अशी टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केली आहे.
"यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो, साहित्याचे वाचन करावे लागते. इतिहास वाचावा लागतो. संदर्भ ग्रंथ वाचावे लागतात. आपण कोणताही संदर्भ न देता थेट अनुकरण करता. एकतर तुम्ही उदार अंतःकरणाने समोर येऊन या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. कोण कुणाच्या घरात जन्माला आले हे महत्त्वाचे नसते. किती चिंतन झाले, किती अभ्यास झाला याच्यावर भाष्यकार होत असतात. अन्यथा खुलासा करणार नसाल तर ती तुमची एक चूक होती हे मान्य केले पाहिजे आणि त्यासाठी माफी मागितली पाहिजे.," असं वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले. काय म्हणाले उदयनराजे भोसले?
"महात्मा फुले चांगले उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जी संपत्ती गोळा केली, ती सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरिता खर्च केली. महात्मा फुले यांनी एकप्रकारे थोरले प्रतापसिंह महाराजांचे अनुकरण केले होते. सर्वात आधी स्त्री शिक्षणासाठी शाळा कुणी सुरू केली असेल तर ती थोरल्या प्रतापसिंहांनी सातारच्या राजवाड्यात केली होती. ज्या राजवाड्यात शाळा सुरू करण्यात आली होती. त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले होते. समाजासाठी झटलेल्या महापुरूषांच्या स्मारकाचे जतन करणे आपल्या सर्वांचे काम आहे," असे उदयनराजे भोसले म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.