विश्रामगृहात आमदारांना वाटण्यासाठी पाच कोटी आणले, अनिल गोटेंचा आरोप, 102 नंबरच्या खोलीला बाहेरुन कुलूप लावत ठाण मांडली
धुळे : जिल्ह्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये आणण्यात आल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. धुळ्यात आलेल्या शासनाच्या अंदाज समितीतील 10 आमदार सदस्यांना देण्यासाठी ही रक्कम आणण्यात आल्याचा दावा गोटे यांनी केला. तसेच त्यांनी विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि तिथेच ठाण मांडली. जिल्हाधिकारी किंवा पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत ही खोली उघडावी अशी मागणीही अनिल गोटे यांनी केली.
धुळ्यामध्ये बुधवारी राज्य शासनाच्या अंदाज समितीतील सदस्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांना देण्यासाठी जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पैसे गोळा केले आणि ते विश्रामगृहावर आणले असा दावा अनिल गोटे यांनी केला. विश्रामगृहाच्या 102 नंबरच्या खोलीमध्ये हे पैसे असल्याचं सांगत अनिल गोटे यांनी त्या खोलीला बाहेरुन कुलूप लावलं आणि त्या खोलीबाहेरच ठाण मांडून बसले.
काय म्हणाले अनिल गोटे?
अनिल गोटे म्हणाले की, "विश्रामगृहातील एका खोलीत पाच कोटी रुपये असल्याचा दावा अनिल गोटे यांनी केला. 102 नंबरच्या खोलीमध्ये हे पैसे आणण्यात आल्याचा दावा गोटे यांनी केला. धुळ्यात आलेल्या अंदाज समितीतील आमदारांना वाटण्यासाठी ही रक्कम आणण्यात आल्याचा दावा अनिल गोटे यांनी केला. या समितीच्या लोकांना भेटण्यासाठी सकाळपासून वेगवेगळ्या खात्यातील लोक येत होते आणि ते थैल्या देऊन जात होते असाही दावा अनिल गोटे यांनी केला."
संजय राऊतांची टीका
अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपांवर संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून संजय राऊतांनी राज्य सरकारवर आरोप केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे? धुळे विश्रामगृहात (खोली नंबर 102) राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती. बुधवारी संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले. त्या खोलीत किमान 5 कोटी रुपये आहेत. कलेक्टरांच्या उपस्थितीत खोली उघडावी एवढीच अपेक्षा आहे. पण सगळेच पळ काढत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.