छत्तीसगड : पहलगाम हल्ल्यापासून देशातील वातावरण गढूळल्यासारखे झाले आहे. याचीच थोडीफार प्रचिती छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) कॅम्पदरम्यान आली. या कॅम्पमध्ये बिगर मुस्लिम
विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप होतो आहे.
याप्रकरणी गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला
गुरुवारी अटक करण्यात आली. दिलीप झा असे या प्राध्यापकाचे नाव आहे.
तत्पूर्वी, या घटनेसंदर्भात 26 एप्रिल रोजी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
करण्यात आल्याची माहिती डीएसपी रश्मीत कौर चावला यांनी दिली.
विद्यापीठातील प्रा. दिलीप झा, सहा.
प्राध्यापक आणि एका विद्यार्थ्यावर भारतीय न्याय संहिता तसेच छत्तीसगड धर्म
स्वातंत्र्य कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या अंतर्गत धर्माच्या
आधारावर द्वेष पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे आणि अन्य तक्रारींच्या आधारे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 मार्च रोजी प्रा. दिलीप झा यांनी एनएसएस
कॅम्पमधील 159 विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडले होते. यापैकी
केवळ चार विद्यार्थी मुस्लीम होते. कोटा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या
शिवतराई गावात 26 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान या कॅम्पचे आयोजन करण्यात आले
होते.
कॅम्पमधून परतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत झालेल्या घटनेची माहिती दिली आणि या घटनेचा निषेध केला. घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनांनीही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. बिलासपूरचे एसपी रजनीश सिंह यांनी चार सदस्यीय समिती स्थापन केली होती. शहर अधीक्षक (कोतवाली) अक्षय सबादरा यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी करण्यात आली. समितीच्या अहवालाच्या आधारे झा आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.