धक्कादायक! पती-सासू-नणंदेच्या छळाला कंटाळून आरोग्य अधिकारी विवाहितेची..., 'वैष्णवी'सारखीच हृदय पिळवटून टाकणारी घटना
पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाची विदर्भातील अमरावती जिल्ह्यात पुनरावृत्ती झाली आहे. एका विवाहीत महिलेने पती, सासू आणि नणंदेच्या मानसिक छळाला कंटाळून 30 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
शुभांगी निलेश तायवाडे असे मृत महिलेचं नाव असून तिच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
शुभांगी तायवाडे ही आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून धामणगाव तालुक्यातील चिंचपूर येथे कार्यरत होती. तिचा पती निलेश तायवाडे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहे. शुभांगी आणि निलेशचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. या दाम्पत्याला तीन वर्षांची मुलगी आणि एक वर्षाची चिमुरडी मुलगी आहे.
विवाहानंतर काही महिन्यातच...
लग्नानंतर काही महिन्यांतच शुभांगीवर मानसिक आणि भावनिक छळ सुरू झाला, असा आरोप शुभांगीच्या आई-वडिलांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती निलेशसोबतच त्याची आई आणि बहीण (शुभांगीची नणंद) यांचाही छळात सहभाग होता, असे शुभांगीच्या आई-वडिलांना तक्रारीत म्हटलं आहे, सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळूनच शुभांगीने आपले आयुष्य संपवण्याइतकं टोकाचं पाऊल उचललं.
आत्महत्येस प्रवृत्त केलं.
शुभांगीच्या आई-वडिलांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे. शुभांगीचा पती निलेश तायवाडे, त्याची आई आणि बहीण यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, शुभांगीच्या मोठ्या दीर व भाचा यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुशिक्षित कुटूंब असूनही...
निलेश आणि शुभांगी उच्चशिक्षित आहेत. त्यात निलेशचे कुटूंब सुशिक्षित असूनही शुभांगीला छळ सहन करावा लागला. शुभांगीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.