जगण्याच्या लढाईत माणूस किती खचतो याची अनेक उदाहरणे आहेत. मंगळवारी असाच एक प्रकार घडला. माजी केंद्रीय मंत्र्याच्या घरी हा धक्कादायक प्रकार घडल्याने सबंध यंत्रणा बारा तास धावत होती. भाजपच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.
भारती पवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी एका पित्याने आपली मुलगी
सोडून निघून गेला. काही वेळाने हे लक्षात आल्यावर सगळीकडे भीतीची आणि
गोंधळाची स्थिती होती. स्वतः डॉ पवार या प्रकाराने अचंभित होत्या. हा सर्व
प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
राज्यमंत्री डॉ पवार यांचे निकटवर्तीय किशोर शिरसाट यांनी याबाबत तातडीने पोलिसांना कळविले. सीसीटीव्ही फुटेज वरून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते अशक्य होते. त्यामुळे हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यानंतर सुरू झाला एक अवघड आणि अशक्य वाटणाऱ्या मुलीच्या वडिलांचा तपास. या तपासात राजकीय कार्यकर्ते आणि सोशल
मीडियावरील नेटकरी एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी पुढे आले तर काय होऊ शकते
याचा आदर्श पाहायला मिळाला. सकाळी नऊ वाजता हा प्रकार घडला होता. संबंधित
व्यक्तीने डॉ पवार यांचेच घर का निवडले? याचाही उलगडा होत नव्हता. त्यामुळे
अनेकांना हा धक्का होता. त्यानंतर पोलीस व कार्यकर्ते सक्रिय झाले. ही
मुलगी सतत रडत होती व तिला काहीही सांगता येत नव्हते. आजूबाजूला तिचे पालक
शोधण्यात आले. मुलीला दूध बिस्किट, खेळणी देऊन शांत केले. ही माहिती
कळल्यावर परिसरातील नागरिकांचीही गर्दी झाली होती.
डॉ पवार यांच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये मुलीच्या वडिलांचा चेहरा दिसत होता. पण त्यांना शोधायचे कुठे? हा प्रश्न सर्वासमोर होता. ते फुटेज किशोर शिरसाट यांनी फेसबुकवर पोस्ट केले. ॲ अजिंक्य गीते यांनी ते मोठ्या प्रमाणात व्हायरल केलं. त्याला यश आले. दिनेश भदाणे या जागरूक नागरिकाने फोन करून ती व्यक्ति आपल्या कंपनीत काम करत असल्याचे सांगितले.श्री शिरसाट, कुणाल बोरसे, पोलीस अधिकारी मोरे, भदाणे कंपनीत गेले. मात्र संबंधिताने नोकरी सोडली होती. त्याच्या बँक खात्याच्या माहितीवरून पत्ता शोधण्यात आला. मात्र ते घर त्याने २०१८ मध्येच सोडले होते. तिथून नवे आव्हान उभे राहिले. पोलिसांनी आधार कार्डवरुन सदरील व्यक्तिच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते रंजन ठाकरे यांच्या मदतीने धुळे येथील त्याच्या वडिलांचा पत्ता शोधला. साक्री (धुळे) तालुक्यातील गावातील सरपंच यांच्या मदतीने संबंधित व्यक्ती व त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर मुलीच्या आईशी संपर्क झाला आणि आईला मुलीच्या स्वाधीन करण्यात आले.आर्थिक परिस्थिती आणि अडचणींमुळे मुलीचे वडील मानसिक दृष्ट्या खचले होते. त्यातून त्यांनी हा प्रकार केल्याचे मुलीच्या आईने सांगितले. आई आणि मुलगी यांची भेट झाल्यावर पोलिसांसह सगळ्यांचेच डोळे पाणावले. बारा तासांचे परिश्रम, राजकीय नेत्यांची सकारात्मकता आणि सोशल मीडियावरील लढाई यशस्वी झाली होती. डॉ भारती पवार यांनी संबंधित महिलेला मदतीचे आश्वासन दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.