मुंबईसारख्या वाहतूककोंडीने ग्रस्त शहरांमध्ये दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता नव्या वाहनांची नोंदणी करण्यासाठी संबंधित महापालिकेकडून मिळालेल्या पार्किंग जागेच्या प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे.
वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
राज्याचे वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "मुंबई महानगर प्रदेशात (MMR) पार्किंगचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे आता जी व्यक्ती नवे वाहन खरेदी करेल, त्याने त्या वाहनासाठी पार्किंगची सोय असल्याचे प्रमाणपत्र महापालिकेकडून घेणे बंधनकारक असेल. अन्यथा वाहनाची नोंदणी केली जाणार नाही."सरकारने राज्यात नवीन पार्किंग धोरण लागू करण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी बैठक घेण्यात आली. सरनाईक म्हणाले, "विकास नियमांचे पालन करून इमारतींसोबत पार्किंगची सोय करणे बंधनकारक केले जाईल. बिल्डरने प्रत्येक फ्लॅटसोबत पार्किंगची जागा देणे आवश्यक असेल." वाहतूक मंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली की, नागरी विकास विभाग मनोरंजनासाठी राखून ठेवलेल्या जागांच्या खाली पार्किंग प्लाझा उभारण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे. त्यामुळे भविष्यात शहरांमध्ये पार्किंगच्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे.सरनाईक यांनी राज्यातील अत्याधुनिक वाहतूक पर्यायांवरही प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, "मी नुकतीच वडोदऱ्याला भेट दिली असून, तेथे जगातील पहिली व्यावसायिक सस्पेंडेड पॉड कार ट्रान्सपोर्ट सिस्टिम सुरु होणार आहे. याच धर्तीवर मीरा-भाईंदर आणि बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पॉड टॅक्सी प्रकल्प राबवण्याचा विचार आहे, जेणेकरून मेट्रोशी जोडणी सुलभ होईल."
सरकारच्या या निर्णयामुळे काय होणार?
हा निर्णय लागू झाल्यास वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल, पार्किंगसाठी रस्त्यांवर होणारी गर्दी कमी होईल आणि नवीन गाड्यांची अनियंत्रित वाढ थांबेल. नागरिकांनी आता वाहन खरेदीपूर्वी पार्किंगच्या सोयीचा विचार करणे अनिवार्य ठरणार आहे. हा निर्णय जरी कठोर वाटत असला, तरी भविष्यातील वाहतूक आणि शहरी नियोजनासाठी तो अत्यंत आवश्यक पाऊल असल्याचे स्पष्ट होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.