Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नागरत्ना होणार पहिल्या महिला सरन्यायाधीश?


नागरत्ना होणार पहिल्या महिला सरन्यायाधीश?


भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण रामकृष्ण गवई यांनी बुधवारी 14मे रोजी शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भूषण गवई यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. भूषण गवई हे सहा महिन्यांसाठी सरन्यायाधीश असणार आहेत. 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत ते देशाच्या सरन्यायाधीशपदी राहतील. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर देशाला पुन्हा एकदा नव्या सरन्यायाधीशांचा शपथविधी करावा लागेल.

यावेळी पहिल्यांदाच देशाला महिला सरन्यायाधीश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण त्यांचा कार्यकाळ अवघा 36 दिवस असू शकतो. सरन्यायाधीशांच्या निवडीसंदर्भातले निकष यासाठी कारणीभूत ठरणार आहेत. न्यायमूर्ती बी. आर. गवईंनी बुधवारी 14 मे रोजी देशाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याजागी न्यायमूर्ती गवई सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

मात्र, याचप्रमाणे जेव्हा सरन्यायाधीश गवई निवृत्त होतील, तेव्हा त्यांच्याजागी अशाच प्रकारे नव्या सरन्यायाधीशांची निवड करावी लागणार आहे. या निवडीसाठी विद्यमान सरन्यायाधीश कॉलेजियममध्ये यासंदर्भातील नावाचा प्रस्ताव ठेवतात आणि कॉलेजियमच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जातो.

सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असणाऱ्या न्यायमूर्तींमध्ये सेवाज्येष्ठता हा सरन्यायाधीशपदासाठी महत्त्वाचा निकष मानला जातो. त्यानुसारच न्यायमूर्ती गवईंची या पदासाठी प्रामुख्याने निवड केली गेली. त्यामुळे न्यायमूर्ती गवईंनंतर सेवाज्येष्ठतेनुसार सर्वात वरीष्ठ न्यायमूर्तींचीच सरन्यायाधीशपदासाठी निवड होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. असं झाल्यास न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना यांची 2027 साली देशाच्या सरन्यायाधीशपदी निवड होऊ शकते. आणि असे झाल्यास 2027 मध्ये न्यायमूर्ती नागरत्ना भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश ठरतील.

बी व्ही नागरत्ना सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती आहेत. त्यांचे वडील ई एस व्यंकटरमय्या हे भारताचे 19 वे सरन्यायाधीश होते. नागरत्ना यांनी त्यांचे शालेय शिक्षण आणि कला शाखेत पदवी नवी दिल्ली येथून घेतली. नंतर, त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायदा विद्याशाखेत पदवी पूर्ण केली. 2008 मध्ये, त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ऑगस्ट 2021 मध्ये, त्यांची भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. नागरत्ना यांनी महिला न्यायमूर्ती म्हणून जवळपास 6 वर्षे 2 महिने काम केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांनंतर जे वरिष्ठ न्यायमूर्ती असतात त्यांच्या नावाची शिफारस केली जात असल्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या कार्यकाळानंतर 24 सप्टेंबर 2027 रोजी बीव्ही नागरत्ना सरन्यायाधीश बनू शकतील परंतु 65 वर्षे वयामुळे त्यांचा कार्यकाळ हा केवळ 36 दिवसांचा असेल.

न्यायमूर्ती नागरत्ना देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांना अवघा 36 दिवसांचा कार्यकाळ या पदावर राहता येणार आहे. त्यांच्या निवृत्तीमुळे 24 सप्टेंबरपासून 36 दिवसांनंतर देशाला पुन्हा एकदा नवे सरन्यायाधीश मिळू शकतील. स्वतंत्र भारताच्या इतिहासात गेल्या 75 वर्षांत आजतागायत एकही महिला न्यायमूर्ती देशाच्या सरन्यायाधीश झालेल्या नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयात फक्त 11 महिलांनी न्यायमूर्ती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.