Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापुरातील मडिलगेत धाडसी दरोडा; 'दराेडेखाेरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू', सुदैवाने मुले वाचली..

कोल्हापुरातील मडिलगेत धाडसी दरोडा; 'दराेडेखाेरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू', सुदैवाने मुले वाचली....
 

आजरा : मडिलगे (ता. आजरा) येथे आज रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास येथील सुशांत सुरेश गुरव यांच्या घरावर दरोडा पडला. दरोडेखोरांनी केलेल्या मराहाणीत सुशांत यांची पत्नी पुजा सुशांत गुरव (वय ३१ वर्षे) एक ठार झाले आहेत. तर सुशांत गुरव यांनाही दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली आहे. सौ. गुरव यांच्या अंगावरील दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केलली आहे. या घटनेने मडिलगे पंचक्रोशी हादरून गेला आहे. सुशांत गुरव यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत जखमी गुरव यांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी नेहमीप्रमाणे गुरव दांपत्य मुलांसोबत घरी झोपले असता रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गुरव यांना जाग आली. त्यानंतर ते प्रातः विधीसाठी गेले. दरम्यान त्यांच्या पत्नीचा जोराने ओरडताना आवाज आला म्हणून त्यांनी पाहिले असता घराचे दोन्ही दरवाजे उघडे असून अज्ञात चौघेजण सौ. गुरव यांना मारहाण करताना दिसले. या प्रकारास त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही जबर मारहाण केली. पत्नीच्या अंगावरील दागिने व गुरव यांच्या गळ्यातील चेन व जवळच असणाऱ्या बॅगेतील रोख रक्कम व दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले. बाहेर येऊन गुरव यांनी घराशेजारील इतर कुटुंबीयांना उठवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या सौ पूजा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. गुरव यांच्या गोंधळाने घटनास्थळी आलेल्या इतर ग्रामस्थांनी गुरव यांना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारा करता दाखल केले आहे.

रेकी करून दरोडा...?
दिवसभर काही बेडशीट विक्रेते फेरीवाले संशयास्पद रीतीने गुरव दांपत्यासोबत वावरत होते. त्यांच्या घरीही बेडशीट विक्रीच्या निमित्याने ते आले होते. या फेरीवाल्यांवरच संशयाची सुई गुरव यांनी व्यक्त केली.
सुदैवाने मुले बचावली...

घटना घडत असताना गुरव यांची दोन लहान मुले घटनास्थळीच होती. ती झोपेत असल्याने बचावली तर त्यांची आई बाहेरगावी पाहुण्यांकडे गेली असल्याने तीही बचावली.

पोलीस घटनास्थळी दाखल
सदर घटना घडल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस घटनेची अधिक माहिती घेत आहेत. १४ तोळे सोने व रोख ९० हजार लंपास झाल्याची शक्यता आहे. या धाडसी दरोड्यामध्ये गुरव कुटुंबीयांचे पारंपारिक सुमारे १२ ते १४ तोळे सोन्याचे दागिने व रोख ९० हजार रुपये लंपास झाल्याची शक्यता गुरव यांनी व्यक्त केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.