तेलंगाणाची राजधानी हैदराबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील चारमिनार भागातील गुलजार हाऊस जवळील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत तब्बल 17 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल
झाले. आज पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात
येत आहे. इतकी मोठी आग लागण्याचं नेमकं कारण काय याची माहिती अजून समोर
आलेली नाही.
इमारतीमधील एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याबाबत अजून खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. सध्या येथे अग्निशमन विभागाचे वाहने पोहोचली आहेत. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली आहे. या आगीत अनेकजण जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासाठी दहा रुग्णवाहिका येथे आहेत.
अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या इमारतीत चार कुटुंबातील काही लोक अडकले आहेत. आतापर्यंत 14 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. यात तीन मुलांचा समावेश आहे. या लोकांनाही आगीच्या झळा बसून जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या इमारतीत 30 पेक्षा जास्त लोक राहत होते. बहुतांश भाडेकरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आग का लागली याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रात्री उष्णता जास्त होती. घरांतील सर्व एसी सुरू होते. यामुळेच वायरिंग गरम झाली आणि आग लागली. या वायरीतून निघालेल्या ठिणगीने पाहता पाहता रौद्ररुप धारण केले. आग इतक्या वेगात पसरली की लोकांना बाहेर पडण्यासाठीही वेळ मिळाला नाही.या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांत अभिषेक मोदी, राजेंद्र कुमार, मुन्नीभाई, सुमित्रा, इराज, आरुषि जैन, हर्षाली गुप्ता, शीतज जैन यांची ओळख पटली आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी आणि तेलंगाणाचे मंत्री पोन्नम प्रभाकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. चारमिनार मतदारसंघाचे माजी आमदार मुमताज अहमद खान देखील येथे हजर होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.