Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठाणे पालिका उपायुक्ताकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी; पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल

ठाणे पालिका उपायुक्ताकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी; पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल
 

ठाणे : ठाणे महापालिकेच्या उपायुक्त तसेच मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील सक्षम प्राधिकारी मिनल पालांडे यांच्याकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी एका पत्रकाराविरोधात चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणीची रक्कम देत नसल्याने पालांडे यांच्या मुलीकडे बघण्याची धमकीही त्याने दिली होती. या प्रकरणी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सुहास उत्तम शिंदे असे खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या पत्रकाराचे नाव असून त्याचे कार्यालय तीन हात नाका येथे आहे. ठाणे येथील पाचपखाडी भागात राहणाऱ्या मिनल पालांडे या ठाणे महापालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. याशिवाय, त्यांच्याकडे ठाणे येथील मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील सक्षम प्राधिकारी या पदाचा पदभारही आहे. त्यांच्या या कायदेशीर नियुक्तीवर सुहास शिंदे हा शंका घेत होता आणि त्या संदर्भात तक्रारी तसेच बदनामीकारक अर्ज प्राधिकरणाकडे वारंवार करीत होता.

तसेच त्याने त्यांना नोकरी घालविण्याची धमकी दिली होती. तसेच हा प्रकार थांबविण्यासाठी त्याने मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या ठाणे कार्यालयातील कार्यकारी अभियंता राजकुमार पवार यांच्याकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. तसेच मिनल पालांडे यांचे परिचित असलेले मुश्ताक खोकर यांच्याकडे तडजोडीअंती १२ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, खंडणीचे पैसे देत नसल्यामुळे त्यांच्या मुलीकडे बघण्याची धमकी दिली. नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या ठाणे कार्यालयात हा प्रकार घडला. 
 
या प्रकरणी मिनल पालांडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे चितळसर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात चितळसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील वरुडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सुहास शिंदे अद्याप अटक नसून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगितले. माझ्या कायदेशीर नियुक्तीवर शंका घेऊन खोटे अर्ज करून बदनामी केली. तसेच पैसे दिले नाहीत म्हणून मुलीकडे बघण्याची धमकी दिली. तसेच माझ्या गाडीचे लोकेशनही काढल्याने माझ्या जिवाला धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने अशाचप्रकारे अनेक अधिकाऱ्यांना त्रास दिला असून त्यांच्याकडूनही आता तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे, असे मिनल पालांडे यांनी सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.