चटणी, लोणचं, कोशिंबीर असे पदार्थ जेवणात असले की जेवणाची रंगत कशी वाढत जाते. शिवाय आपण खातो त्या चटण्या, कोशिंबीरीचे प्रकार हे पदार्थ काही फक्त जेवणाचा स्वाद खुलविण्यासाठीच उपयुक्त नसतात. तर त्यांच्यामध्ये कित्येक पौष्टिक पदार्थही असतात. बऱ्याचदा आपल्याला भाजी- पोळी या पदार्थांमधून जे पौष्टिक घटक मिळत नाहीत ते पौष्टिक घटक चटणी, कोशिंबीर या पदार्थांमधून मिळतात. आता आपण अशाच एका पौष्टिक चटणीची रेसिपी पाहणार आहोत.
ही चटणी कुटूंबातील सगळ्याच सदस्यांसाठी पौष्टिक आहे. पण महिलांसाठी ती विशेष फायदेशीर ठरते. कारण बाळंतपणानंतर अनेकींना पाठदुखी, कंबरदुखी असा त्रास सुरू होतो . उभं राहून काम करण्याचं प्रमाण महिलांमध्ये जास्त असतं त्यामुळे त्यांना गुडघेदुखीचा त्रासही होतो . हा त्रास कमी करण्यासाठी ही चटणी अतिशय उपयुक्त ठरते. शिवाय ती केसांच्या वाढीसाठीही फायदेशीर आहे. बघुया ती चटणी नेमकी कोणती...
जवस कडिपत्ता चटणी रेसिपी
साहित्य
२ चमचे जवस
अर्धी वाटी कडिपत्त्याची पाने
२ चमचे तीळ
१ चमचा डाळवं
२ चमचे शेंगदाणे
८ ते १० लसूण पाकळ्या
४ ते ५ लाल मिरच्या
१ टीस्पून जिरे
१ टेबलस्पून किसलेलं खोबरं
चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी कढईमध्ये जवस आणि तीळ भाजून घ्या. नंतर ते कढईतून काढून घ्या आणि त्याच कढईमध्ये तेल घालून त्यात कडिपत्ता, लसूण, मिरच्या, खोबरं घालून परतून घ्या. आता भाजून आणि परतून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात घाला. याचवेळी त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, डाळवंही घाला. मिक्सरच्या भांड्यातून अगदी बारीक फिरवून घ्या. अतिशय पौष्टिक अशी चटणी झाली तयार. ही चटणी रोजच्या जेवणात एकदा तरी एक चमचा खायलाच हवी. यामुळे आरोग्याच्या कित्येक समस्या कमी होतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.