Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस डायरी - भ्रष्टाचाराचा 'भस्मासुर' वाढत आहे, सरन्यायाधीशांचा दणका

पोलीस डायरी - भ्रष्टाचाराचा 'भस्मासुर' वाढत आहे, सरन्यायाधीशांचा दणका
 

गेल्या आठवड्यात (13 मे) मुंबईच्या पूर्व उपनगरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव मधुकर देशमुख यास एका शाळेच्या पदाधिकाऱ्याकडून एक लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. हा अधिकारी ‘मे’अखेरीस सेवानिवृत्त होणार होता. निवृत्तीपूर्वी जेवढी माया जमा करता येईल, तेवढी करण्याचा प्रयत्न त्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू केला होता, परंतु अभी नहीं तो कभी नही. निवृत्त झाल्यावर, खाकी वर्दी उतरल्यावर आपल्याला कोण विचारणार आहे, असा विचार करून त्याने शाळेचा ताबा घेतलेल्या काही व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शाळेच्या ट्रस्टीकडे पाच लाखांची मागणी केली, परंतु पाच लाख रुपये देण्याची तयारी नसलेल्या ट्रस्टींनी वरळीच्या अ‍ॅण्टीकरप्शनकडे तक्रार करून बापूराव देशमुखला अ‍ॅण्टीकरप्शनच्या ताब्यात दिले. याआधी पूर्व उपनगरातील टिळक नगर पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक वामन बागुल हा रात्रीच्या गर्द अंधारात लाच घेताना रंगेहाथ सापडला होता. त्याचीही सेवानिवृत्ती जवळ आली होती. त्यानेही जाता जाता हात मारायचा प्रयत्न केला, परंतु तो त्याच्या अंगाशी आला.

गेल्या वर्षभरात तर (1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024) 201 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यात नाशिक, पुणे, ठाणे या शहरांतील पोलीस आघाडीवर आहेत. गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रातून 60 पोलिसांवर अॅण्टीकरप्शनने कारवाई केली आहे. त्यातही नाशिक, पुणे व ठाणे शहरांतील पोलीस आघाडीवर आहेत. पोलीस हे अत्यंत सॉफ्ट टार्गेट आहेत. पैसे मागणे हा भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी आपला हक्कच समजतात आणि अ‍ॅण्टीकरप्शनच्या जाळ्यात अडकतात. पूर्वी लोक तक्रार करायला घाबरायचे. पोलिसांविरुद्ध तक्रार करायची म्हणजे आपल्यावर संकट ओढवून घ्यायचे, परंतु आता कुणी पोलिसांना घाबरत नाही महाराष्ट्रातून गेल्या वर्षी एक हजार शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाच घेताना अ‍ॅण्टीकरप्शनने कारवाई केली होती, तर गेल्या पाच महिन्यांत (18 मेपर्यंत) 420 लोकसेवक अ‍ॅण्टीकरप्शनच्या जाळ्यात अडकले. त्यात महसूल विभागाचा सालाबादप्रमाणे पहिला, तर पोलिसांचा लाच स्वीकारताना (रंगेहाथ पकडले जाण्यात) दुसरा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी महसूल विभागाचे 252. तर 201 पोलीस लाच घेताना पकडले गेले. महाराष्ट्रात रोज सरासरी तीन लोकसेवक लाच घेताना पकडले जातात. मग न पकडले जाणारे शहाणे किती असतील याचा विचार करा.

आपल्या देशातील सर्व शासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरल्या गेल्या आहेत. त्याला न्याय यंत्रणाही अपवाद नाही. नव्हे. न्याय यंत्रणेत तर सर्वात जास्त भ्रष्टाचारी दिसून येतात. तळागाळातील कारकुनापासून ते अगदी वरपर्यंतः नाहीतर मुंबईतील सत्र न्यायाधीश जे. डब्ल्यू सिंग यांना जेलमध्ये जावे लागले नसते. अलीकडे सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्याविरुद्ध अ‍ॅण्टीकरप्शनने गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आपले निवासस्थान सोडून पळ काढावा लागला होता. न्यायाधीश धनंजय निकम यांनी मध्यस्थामार्फत एका महिलेकडे पाच लाखांची लाच मागितली होती हे एका ऑडियो कॉलमध्ये उघड झाले होते.
सातारचे सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांचे प्रकरण ताजे असतानाच दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी 15 कोटींहून अधिकची रोकड आढळून आली. 14 मार्च 2025 रोजी वर्मा कुटुंबीय घरी नसताना त्यांच्या स्टोररूममध्ये आग लागली. ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तेथे पोहोचले असता डोळे विस्फारून टाकणारी रोकड दिसून आली. त्यातील बऱ्याच नोटा जळालेल्या अवस्थेत होत्या. न्यायमूर्ती वर्मा यांची सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तत्काळ अलाहाबादला बदली केली, परंतु तेथील वकिलांनी विरोध केल्यामुळे सध्या वर्मा यांना कोणतेच काम देण्यात आलेले नाही. उलट या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी एक समिती नेमली. संजीव खन्ना आता निवृत्त झाले आहेत. भूषण रामकृष्ण गवई या महाराष्ट्राच्या सुपुत्राने देशाचे सरन्यायाधीश म्हणून नुकतीच सूत्रे हाती घेतली आहेत. 
 
सहा महिन्यांनी तेही निवृत्त होणार आहेत, परंतु वन विभागाची पुण्यातील 30 एकर जमीन हडप करून खासगी व्यक्तींना विकणाऱ्या एका मंत्र्याला सरन्यायाधीश भूषण गवई व त्यांच्या खंडपीठाने दणका दिला. बिल्डरला वन विभागाची जमीन देण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरविला. सरन्यायाधीशांच्या या धाडसी निर्णयामुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आपल्या देशातील भ्रष्टाचाराला आळा बसेल यासाठी सध्याचे सरन्यायाधीश काही क्रांतिकारी निकाल देतील असे वाटू लागले आहे. पोलीस किंवा कोणताही लोकसेवक असो, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. परंतु सरकारी जागा, वनसंपत्ती विकून गडगंज झालेले राजकारणी हे भ्रष्टाचाराचे मोठे भस्मासुर, डायनासोर आहेत. या भस्मासुरांनी सारा समाज पोखरला आहे. पूर्वी भ्रष्टाचारी व्यक्तीला कमी लेखले जायचे. आता भ्रष्टाचारी व्यक्तींना, राजकारण्यांना, नोकरशहांना प्रतिष्ठा मिळत आहे. दुर्दैव या देशाचे. दुसरे काय?

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.