रोहा बलात्कार प्रकरणातील निकालावर गावकऱ्यांचा संताप, उज्ज्वल निकमांचा पराभव, पीडितेच्या कुटुंबावर अन्याय
रायगडमधील रोहा तालुक्यातील तांबडी गावातील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे 8 मे रोजी माणगाव सत्र न्यायालयाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पेणमधील नवख्या वकिलांनी प्रख्यात वकील
उज्ज्वल निकम यांचा पराभव करणे ही आश्चर्यकारक आहे. हा निकाल आरोपींच्या
बाजूने लागल्याने सर्वांनाच याचा धक्का बसला आहे. याप्रकरणी रोहा शहरासह
संपूर्ण रायगड जिल्ह्यात या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
पीडितेच्या कुटुंबावर अन्याय
खरे मुख्य आरोपी लपवून आदिवासी तरुणांना पुढे करण्यात आले आणि राजकीय हस्तक्षेपामुळे खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्यात आले, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. या निर्णयामुळे पीडितेच्या कुटुंबावर अन्याय झाला आहे, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.
सकल मराठा समाज आणि गावकऱ्यांचा गंभीर आरोप
पुराव्यांची पडताळणी, साक्षीदारांचे जबाब आणि डीएनए चाचण्या यात गंभीर त्रुटी आढळल्या. पोलिसांनी सात आदिवासी तरुणांना ताब्यात घेतले, पण ठोस पुरावे गोळा करण्यात अपयश आले. पोलिसांनी जाणीवपूर्वक तपास ढिसाळ ठेवला आणि खऱ्या आरोपीला कदाचित प्रभावशाली व्यक्तीला वाचवण्यासाठी आदिवासी तरुणांना अडचणीत टाकले, असा सकल मराठा समाज आणि गावकऱ्यांनी आरोप केला आहे. याशिवाय पोलिस आणि राजकीय नेत्यांनी मिळून हा कट रचला आणि पुरावे नष्ट केले, असाही गावकऱ्यांनी दावा केला आहे.
जनआक्रोश मोर्चात असंख्य नागरिक सहभागी
आज रोहा शहरात पीडित मुलीच्या कुटुंबासह तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून या घटने संदर्भात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी आरोपीला फाशी झाली पाहिजे, अशा घोषणा देत महिलांनी संताप व्यक्त केला आहे. या जनआक्रोश मोर्चात असंख्य नागरिक सहभागी झाले होते. महिलांनी देखील संतापाची भावना व्यक्त करत या प्रकरणात पीडित मुलीला योग्य न्याय मिळावा, अशी सरकारकडे मागणी केली आहे.
अदिती तटकरेंची प्रतिक्रिया
या संपूर्ण प्रकरणावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी, “हे प्रकरण न्यायालयीन असल्याने आम्हाला यावर काही जास्त भाष्य करणे किंवा बोलणं बंधनकारक आहे. परंतू, आम्ही सदर कुटुंबाला न्याय देण्याकरिता उच्च न्यायालयात लवकरात लवकर अपील दाखल करणार आहोत. पीडित मुलीला व तिच्या कुटुंबाला न्याय देण्याकरता आम्ही सर्वच कटिबद्ध असून मी या कुटुंबासोबत आहे,” असे सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.