अहमदाबाद इथं झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या २४२ प्रवाशांपैकी केवळ एक जण बचावल्याची माहिती सध्या मिळते आहे. पण ज्या प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं
निश्चित झालं आहे, त्या प्रवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी
रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. टाटा ग्रुपनं ही मोठी घोषणा केली
आहे.
टाटा ग्रुपनं निवेदनात काय म्हटलंय?
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी संस्थेच्यावतीनं काढलेल्या निवदेनात म्हटलं की, "या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना टाटा ग्रुप १ कोटी रुपये देईल. जखमींच्या वैद्यकीय खर्चाचीही आम्ही जबाबदारी घेऊ आणि त्यांना आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत मिळेल याची खात्री देतो. याव्यतिरिक्त, आम्ही विमानाच्या क्रॅश लँडिंगमुळं झालेल्या बीजे मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करू"
नेमकं काय घडलं?
विमानाचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळं झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण अहमदाबादहून दुपारी १.३८ मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच उड्डाणावेळी विमानात मोठा बिघाड झाला आणि मोकळ्या किंवा सुरक्षित ठिकाणी विमानाचं क्रॅश लँडिंग करण्यासाठीही पायलटला वेळ मिळाला नाही. हे विमान थेट अहमदाबादमधील एका सिव्हील हॉस्पिटलच्या सात मजली इमारतीमध्ये घुसलं. त्यामुळं इमारतीलाही मोठी आग लागली तसंच इथले काही डॉक्टर्स, रुग्ण हे देखील यामध्ये जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.
सर्व प्रवाशी दगावल्याची भीती
अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना सांगितलं की, "विमान अपघातात कोणीही वाचलेलं दिसतं नाही, अनेक कार्यालये असलेल्या निवासी भागात विमान कोसळल्यानं यामध्ये काही स्थानिक लोकांचाही मृत्यू झालेला असू शकतो. पण मृत्यूची अचूक आकडेवारी अद्याप समोर येत आहे"
प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी दोन विशेष विमानं
'एअर इंडिया प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी दिल्ली आणि मुंबईहून अहमदाबादला प्रत्येकी दोन मदत विमानांचे नियोजन एअर इंडियानं केलं आहे. दिल्ली आणि मुंबईतील प्रवाशांचे नातेवाईक आणि कर्मचारी या विमानांमधून प्रवास करू इच्छितात ते आमच्या हॉटलाइनवर १८०० ५६९१ ४४४ वर कॉल करू शकतात. याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय ठिकाणांहून येणारे आणि प्रवास करू इच्छिणारे आमच्या हॉटलाइनवर +९१ ८०६२७७९२०० वर कॉल करू शकतात,' असे एअर इंडियाने ट्विटद्वारे कळवलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.