कोल्हापूर : प्रेमविवाह करूनही लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच 10 लाखांच्या हुंड्यासाठी सात महिन्याच्या गर्भवतीचा मानसिक छळ करून जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वरणगे पाडळीमधून उघडकीस आला आहे. पीडित महिलेनं पतीविरोधात करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रोहीत अर्जुन दुधाणे (रा. मधली गल्ली, वरणगे पाडळी ता. करवीर) असे पतीचे नाव आहे. पीडिताने आपल्या तक्रारीत ऑक्टबर २०२४ ते २ जून २०२५ पर्यंत पती रोहितने तुझ्या आई वडिलांनी मला लग्नात काहीच दिले नाही, त्यामुळे दहा लाख रुपये दे म्हणत मारहाण करुन शारिरीक, मानसिक छळ व जाचहाट करत जीवे मारणेची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडिता नर्सिंगचे शिक्षण घेत असताना रोहितशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर गेल्यावर्षी मे महिन्यात रोहित आणि पीडिताचा विवाह कोल्हापुरातील शुक्रवार पेठेत झाला. विवाहानंतर चार महिन्यांनी पीडिता ऑक्टोबर २०२४ मध्ये गर्भवती राहिल्यानंतर रोहितने किरकोळ कारणांवरून पीडिताला त्रास देण्यास सुरुवात केली. सकाळी लवकर उठत नाही, अशा कारणांवरूनही वाद होत होता.
पीडिताने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रोहित रोज कामावरुन आल्यानंतर मला बाळ नको असल्याचे सांगत गर्भपात करून मला घटस्फोट दे, तुझ्या आई वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही, मला आता १० लाख रुपये दे नाहीतर मला सोडून जा असे म्हणून त्रास देत होता. यानंतर २५ एप्रिल २०२५ मध्ये पाडिताला सातव्या महिन्यात रोहितने माहेरी आणून सोडले होते. त्यानंतर पीडिताने पतीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. १७ मे रोजी पीडिताच्या मामांनी मध्यस्थी केल्यानंतर सासरी नांदण्यास गेली होती.यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा रोहितच्या घरातून लवकर जाण्यावरून पीडिताने विचारणा केली असता शिवीगाळ करत तू पहिल्यांदा गर्भपात कर, मग बोल, तू माझ्याकडे राहू नको, निघून जा अशी धमकी दिली. संध्याकाळी उशिरा आल्यानंतर विचारणा केली असता तू मला काही विचारायचं नाही. पोटावर मारुन तुला ठार मारीन अशी रोहितने धमकी दिली. लग्नाच्या वाढदिनी सांगूनही लवकर घरी न आल्यानंतर संध्याकाळी उशीरा घरी आल्यानंतर मोबाईलवर बोलण्याची शंका आल्यानंतर संभाषण ऐकले असता मारहाण व शिवीगाळ करुन मला पुन्हा ठार मारण्याची धमकी दिली व मला घरातुन बाहेर काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तीन दिवसांपूर्वीच पीडिताच्या नातेवाईकांना हणबरवाडीमध्ये (ता. करवीर, जि. कोल्हापूर) रोहित अन्य एका महिलेसोबत रंगेहाथ लॉजवर सापडला होता. यावेळी त्याने पीडिताच्या नातेवाईकांना लॉजबाहेर येत दमदाटी करत शिवीगाळ करत मारहाण केली होती. यामध्ये सोबत आलेल्या महिलेनं सुद्धा त्याला साथ दिली होती. रोहितने एका महिलेच्या डोक्यात लाकडी बॅटन पट्टी मारून जखमी केले होते. या मारहाण प्रकरणी इस्पूर्ली पोलिस ठाण्यात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.