सांगली: दोन वर्षापुर्वी मार्केट यार्ड परिसरात रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरणातील संशयित प्रिन्सकुमार शिवनाथ सिंग (वय २७, तानापुर, दिलावरपुर, जिल्हा- वैशाली, राज्य- बिहार) यास विश्रामबाग पोलिसांनी आज अटक केली. डेहराडून कारागृहातून त्याचा ताबा घेत ही कारवाई करण्यात आली. गुन्ह्यावेळी दुचाकी पुरवण्यात त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी आत्तापर्यंत दरोड्यातील सहा संशयितांना ताब्यात घेतले असून अद्याप मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही. प्रिन्सकुमार याच्याकडे आता कसून चौकशी केली जाणार असल्याचे विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले. अधिक माहितची अशी, की शहरातील मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स या पेढीवर ४ जून २०२३ रोजी दरोडेखोरांनी भरदुपारी सशस्त्र दरोडा टाकून पंधरा ते वीस मिनीटात ६ कोटी ४४ लाख रुपयांच्या दागिन्यांची लूट केली होती. दरोडेखोरांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करीत कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून दागिने घेवून चारचाकीतून पसार झाले होते.
यावेळी दरोडेखोरांनी एका ग्राहकाच्या दिशेने केलेल्या गोळीबार केला होता. त्यात सुदैवाने तो बचावला होता. भरदुपारी अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर आणि पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या नियोजबद्ध रित्या टाकण्यात आलेल्या दरोड्याने राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिस दल खडबडून जागे झाले. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार सुबोध सिंग याला अटक केली. त्यानंतर मंहमद मुख्तार याला बिहारमधून अटक केली. यानंतर प्रिन्सकुमार याचे नाव निष्पन्न झाले होते.
त्याच्यासह अन्य संशयितांच्या शोधासाठी एलसीबीसह विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने बिहारमध्ये तळ ठोकला होता. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही. अखेर त्याला आज डेहराडून कारागृहातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून आता कसून चौकशी केली जाणार आहे. निरीक्षक भालेराव अधिक तपास करत आहेत.
डेहराडून दरोड्यात प्रिन्सकुमार
सांगलीतील दरोड्यानंतर संशयितांनी डेहराडून येथी रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकला होता. तेथूनही कोट्यवधींचे दागिने पळवले होते. त्यावेळी प्रिन्सकुमार याला डेहराडून पोलिसांनी अटक केली होती. त्याचा सांगलीतील दरोड्यात सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले होते. त्यानंतर पत्रव्यवहार करून ट्रांजिट रिमांडद्वारे सांगली कारागृहात आणण्यात आले होते. तेथून विश्रामबाग पोलिसांनी आज त्याचा ताबा घेतला. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
घटनास्थळी फिरवले
प्रिन्सकुमार याला विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी आज फिरवले. त्यावेळी त्याने घटनेवेळी वापरण्यात आलेली दुचाकी पुरवल्याचे सांगितले. ही दुचाकी कर्नाटकातील असून लातुर येथील घेतल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले. ही दुचाकी महत्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जप्त करण्यात आली आहे.
यापुर्वी पाच जणांना अटक
दरोड्यातील मुख्य सुत्रधार सुबोध सिंग ईश्वरप्रसाद सिंग (चिश्तीपूर, थाना - चंडी, जि. नालंदा, बिहार), महंमद शमशाद महंमद मुख्तार (चेरिया, जि. बेगुसराय बिहार), अंकुरप्रताप रामकुमार सिंग (तारवान, नौबातपूर, जि. पाटणा, बिहार), शशांक उर्फ सोनू धनंजयकुमार सिंग (रा. सोनपुरा, जि. सदरसा, राज्य- बिहार) आणि एसपी ऊर्फ अनिल सोहनी (रा. जिंदाल सॉ लिमिटेड, मुंद्रा, राज्य - गुजरात) या पाच जणांना अटक करण्यात आली होती. आता प्रिन्सकुमार याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरोड्यातील संशयित गणेश उध्दव बद्रेवार (रा. हैद्राबाद ), प्रताप अशोकसिंग राणा (रा. वैशाली, राज्य - बिहार ), कार्तिक नंदलाल मुजुमदार ( रा. हुगळी, राज्य - पश्चिम बंगाल) यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.