...तर लवकरच पेट्रोल 150 रुपये लिटर दराने मिळणार? सर्वासामान्यांना दुहेरी फटका कारण...
इस्रायलने इराणमधील अणू ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचा मोठा आर्थिक फटका सर्वसामान्य भारतीयांना बसू शकतो असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र हे खरं आहे.
इस्रायलने इराणवर हल्ला केल्याने जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये एका दिवसात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 30 मे 2025 रोजी कच्च्या तेलाचे दर 62 डॉलर प्रतिबॅरल इतक्या खाली घसरले होते. मात्र, यात वाढ होत ते 78 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहेत. शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजाराने गेल्या सहा महिन्यात गुंतवणूकदारांना शून्य टक्के रिटर्न्स दिले आहेत.
इराण अन् तेल कनेक्शन
इराण जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. शिवाय इराणचे भौगोलिक स्थानही अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' ही एक जलवाहतूक मार्गिका आहे, जिथून सौदी अरेबिया, कुवेत, इराक यासारख्या देशांचा तेल पुरवठा होतो. जर इराणने हा मार्ग बंद केला, तर जगातील सुमारे 20 टक्के तेल पुरवठा थांबू शकतो. यामुळे तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
सामान्य नागरिकांवर दुहेरी परिणाम
कच्च्या तेलाच्या किमती अशाच वाढत केल्या तर तेल विक्री कंपन्यांना पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवाव्या लागतील. यामुळे वाहतूक, अन्नपदार्थ, इतर वस्तू महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेल कंपन्यांमध्ये शेअर बाजाराच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना दुहेरी फटका बसू शकतो. म्हणजेच पेट्रोल-डिजेल अधिक दराने विकत घेण्याबरोबरच कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूकही अपेक्षित परतावा देणारा नाही अशी शक्यता आहे
तेलाच्या किमती वाढतील?
युद्धामुळे जगभरात अस्थिरता वाढल्याने पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका आहे. कच्च्या तेलाच्या किमती 80 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरवाढीचा बोजा सरकार थेट सर्वसामान्यांवर टाकू शकते असंही म्हटलं जात आहे. ज्या दराने अंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढले. त्याच पटीत म्हणजेच 25 ते 30 टक्क्यांहून अधिक प्रमाणात पेट्रोलचे दर वाढल्यास त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसू शकतो. अशाप्रकारे अंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाचे दर वाढल्यास त्याहून थोड्या अधिक चढ्या दरात घाऊक किंमतीत वाढ केली जाते. म्हणूनच पुढील काही आठवड्यांमध्ये दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला, कच्चा तेलाची कमतरता निर्माण झाली तर पेट्रोल दीडशे रुपये प्रती लीटरच्या आसपासपर्यंत जाऊ शकते, अशी भितीही व्यक्त केली जातेय.
नेतान्याहू यांचा इराणच्या नागरिकांना संदेश
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी इराणच्या जनतेला उद्देशून एक भाषण केलं. "इराणच्या अभिमानी लोकांना, आपण इतिहासातील सर्वात मोठ्या लष्करी कारवाईंपैकी एक, ऑपरेशन रायझिंग लायनच्या मध्यभागी आहोत. जवळजवळ 50 वर्षांपासून तुमच्यावर अत्याचार करणारी इस्लामिक राजवट माझ्या देशाला, इस्रायल राज्याला नष्ट करण्याची धमकी देत आहे. इस्रायलच्या लष्करी कारवाईचा उद्देश इस्रायलला असलेला अणु धोका आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा धोका दूर करण्याचा आहे," असं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.