Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकारची 'सक्षम' आरोग्य यंत्रणा ! मृत अर्भकाला पिशवीत घालून पित्याचा नाशिक ते खोडाळा एसटीने 90 किमी प्रवास

सरकारची 'सक्षम' आरोग्य यंत्रणा ! मृत अर्भकाला पिशवीत घालून पित्याचा नाशिक ते खोडाळा एसटीने 90 किमी प्रवास



राज्य सरकारची ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा किती 'सक्षम' आहे याचे आणखी एक धक्कादायक वास्तव आज समोर आले आहे. शववाहिनी न मिळाल्याने एका गरीब आदिवासी पित्याला त्याचे मृत अर्भक पिशवीत घालून नाशिक सिव्हिल हॉस्पिटल ते खोडाळ्यातील जोगलवाडी असा तब्बल 90 किलोमीटरचा प्रवास एसटीने करावा लागल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मोखाडय़ातील या मन सुन्न करणाऱया घटनेने अवघा पालघर जिल्हा हादरला आहे.

मोखाडा तालुक्यात माता व बालमृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना सरकारी आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले आहेत. खोडाळापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जोगलवाडीमध्ये राहणारी अविता कवर (26) या गर्भवती महिलेला बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रसूतिकळा सुरू झाल्या. त्यामुळे पती सखाराम याने कॉल करूनही रुग्णवाहिका आलीच नाही. दुसरया दिवशी सकाळी 8 वाजता पुन्हा एकदा रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न करूनही अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. अखेर दुपारी अविताला खोडाळा आरोग्य केंद्रात दाखल केले.

 
मातेचा जीव वाचला

नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सर्व आरोग्य तपासण्या तातडीने केल्यानंतर अविता कवर या महिलेवर शस्त्राक्रिया करून मृत अर्भक बाहेर काढले. त्यामुळे तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. मात्र मृत अर्भकाला आपल्या जोगलवाडी या गावात नेण्यासाठी शववाहिकाच मिळाली नाही. अखेर त्याने ते अर्भक पिशवीत टाकून नाशिक ते जोगलवाडी असा 90 किलोमीटरचा प्रवास एसटीने केला. त्यानंतर अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा प्रकार समजताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

- खोडाळ्यातील डॉक्टरांनी तपासले असता बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महिलेला मोखाडय़ाच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

- गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास अविता हिला मोखाडयाच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. पण दुर्दैवाने तिचे बाळ पोटातच दगावले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले.

- बाळ दगावल्याने मातेचाही जीव धोक्यात आला होता. त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला मोखाडयाहून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पतीला पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी मारले

वेळेवर रुग्णवाहिका तसेच उपचार न मिळाल्याने संतापलेला पती सखाराम हा खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना जाब विचारण्यासाठी गेला. यावेळी बाचाबाची झाल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र पोलिसांनी त्याला कोणतीही शहानिशा न करता किंवा झालेल्या घटनेची माहिती न घेता लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीची चौकशी करण्यात येणार आहे. 


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.