मर्सिडीज उलटली, 9 एअर बॅघ उघडल्या, तरी बड्या उद्योजकाचा मृत्यू; समृद्धीवर भीषण अपघात
नाशिक : समृद्धी महामार्गावर शहापूर हद्दीत बुधवारी झालेल्या भीषण अपघातात नाशिकमधील सुप्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि दोन मुले जखमी झाले आहेत. हेकरे कुटुंबीय मुंबईहून नाशिकला परतत असताना इगतपुरी बोगद्याजवळ हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील हेकरे हे त्यांच्या मर्सिडीज GLS 400D या आलिशान एसयूव्हीमधून प्रवास करत होते. ही गाडी त्यांचा मुलगा चालवत होता, तर सुनील हेकरे समोरील सीटवर आणि त्यांची पत्नी व दुसरा मुलगा मागच्या सीटवर बसले होते.
शहापूरजवळ महामार्गावर पावसाचे पाणी साचले होते. यावेळी दुसऱ्या गाडीने वेगाने पाण्यातून जाण्यामुळे साचलेले पाणी हेकरे यांच्या गाडीच्या काचेवर उडाले. परिणामी, काही सेकंद चालकाला समोरचे दृश्य दिसेनासे झाले. गाडीचा वेग जास्त असल्याने नियंत्रण सुटले आणि गाडी दुसऱ्या लेनमध्ये घुसून दुभाजकाला धडकली अशी माहिती समोर आली आहे.
या अपघातात सुनील हेकरे गाडीच्या दरवाजातून बाहेर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मर्सिडीज GLS 400D मध्ये 9 एअर बॅग असूनही हेकरे यांच्या बाजूची एअर बॅग उघडली गेली, तरी त्यांचा जीव वाचला नाही. मात्र, इतर प्रवाशांच्या एअर बॅग उघडल्याने त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा जीव वाचला, तरी ते जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने नाशिकच्या उद्योग वर्तुळात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून, रस्त्यावरील पाणी साचण्यासह इतर कारणांचा शोध घेतला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.