Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'शक्तिपीठ'साठी पोलिस बंदोबस्तात मोजणी, सांगलीतील शेटफळे येथे शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; जमिनीवर झोपून मोजणी पाडली बंद

'शक्तिपीठ'साठी पोलिस बंदोबस्तात मोजणी, सांगलीतील शेटफळे येथे शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; जमिनीवर झोपून मोजणी पाडली बंद
 

आटपाडी : शेटफळे (ता. आटपाडी) येथे शक्तीपीठ महामार्गासाठी आज शेटफळे येथे दुसऱ्यांदा मोजणीस सुरुवात झाली. मात्र, शेतकऱ्यांनी तगड्या पोलिस बंदोबस्तातही मोजणीला तीव्र विरोध केला. " शेतकरी एकजुटीचा विजय असो" अशा घोषणा देत मोठ्या संख्येने शेतकरी एकवटले अन् जमिनीवरच झोपले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गाचे नियोजन शेटफळे गावातून करण्यात आले आहे. सुमारे ४२९ शेतकऱ्यांच्या जमिनींचा या प्रकल्पात समावेश असून, ४० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित होणार आहे.

महसूल विभागाने मोजणीसाठी केवळ एक ते दोन दिवस आधी, म्हणजे मंगळवारी, शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या. याआधीही मोजणीसाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागल्याने मोजणी रद्द करण्यात आली होती. शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे की, मोजणी करण्याआधी भरपाईचे निकष जाहीर करावेत. यासंदर्भात प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी दोन वेळा शेतकऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या. मात्र, प्रशासनाने यावेळी कोणतीही भरपाई जाहीर न करता मोजणी सुरू केल्याने नाराजी वाढली आहे.

आज बुधवारी मोजणीवेळी तहसीलदार सागर ढवळे आणि पोलीस निरीक्षक विनय बहिर हे घटनास्थळी उपस्थित होते. प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही शेतकऱ्यांनी शांततेत पण ठाम विरोध नोंदवत मोजणीला विरोध केला. प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना दाद दिली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोजणी सुरूच

शेतकऱ्यांच्या विरोधात नंतरही प्रशासनाकडून सायंकाळी उशिरापर्यंत मोजणी सुरूच होती. प्रशासन मोजणीवर ठाम असून मोजणी सुरूच आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.