लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकींसंदर्भात काही खळबळजनक आरोप केले आहेत. "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचे मॅच फिक्सिंग!" असं राहुल गांधीनी म्हटलं आहे. एका लेखामधून त्यांनी हे आरोप केले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात शंका उपस्थित करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका लेखात त्यांनी निवडणुकीचं संपूर्ण प्रकरण "औद्योगिक पातळीवरील निवडणूक रिगिंग" असल्याचं म्हटलं आहे.
सरकारने यादी लपवून...
महाराष्ट्रात जी 'मॅच फिक्सिंग' झाली ती आता बिहार, इतर राज्यांमध्ये होणार याची भीती आहे, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. निवडणुकीची पारदर्शकता संपली तर लोकशाहीची फक्त नावालाच पत राहील. मतदार याद्या आणि सीसीटीव्ही फुटेज म्हणजे लोकशाहीचं रक्षण करण्याची साधनं, शोभेच्या गोष्टी नाहीत, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला आहे. "सरकारने यादी लपवून जनतेच्या विश्वासाला सुरुंग लावला आहे. ही निवडणूक म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी घडवलेला खेळ आहे" असंही राहुल गांधी म्हणालेत. राहुल गांधींनी मांडलेले पाच मुद्दे पुढील प्रमाणे...
1निवडणूक आयुक्तांची निवड करणारी समितीच हेरफेर करून फिक्स केली जाते. 2023 मध्ये झालेल्या कायद्यानुसार पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या हातात बहुमत ठेवून लोकशाही संस्थेचा अपमान करण्यात आला आहे.
2मतदार यादीत बनावट नावांची मोठ्या प्रमाणावर भर करण्यात आली आहे. मे 2024 लोकसभा निवडणुकीपासून नोव्हेंबरपर्यंत फक्त 5 महिन्यांत तब्बल 41 लाख नवीन मतदारांची भर पडली. सरकारी आकड्यांनुसार असलेल्या प्रौढ जनसंख्येपेक्षा मतदार संख्या अधिक आहे.3मतदानानंतर आकडे फुगवण्यात आले. दिवसअखेरीस मतदान 58.22 टक्के दाखवले गेले. त्यानंतर सकाळी अचानक तेच मतदान 66.05 टक्क्यांवर आलं. यात 76 लाख मतांची चमत्कारिक भर पडली.4बनावट मतांद्वारे निश्चित जागांवर परिणाम झाला. 12 हजार बुथावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर असलेल्या जागांवर चमत्कारिक वाढ दिसून आली. कामठीचं उदाहरण घेता येईल - भाजपची मतं 56 हजारांनी वाढले, काँग्रेस तेवढ्याच मतावर स्थिर राहिली.5पुरावे लपवण्यासाठी नियमात बदल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज मागितल्यावर निवडणूक आयोगाकडून अडथळे आणण्यात आले. नियम 93(2)(a) मध्ये बदल करून लोकशाही प्रक्रियेचे निरीक्षण अडवले. EPIC कार्डमध्ये डुप्लिकेट ओळख पटली.
शेवटी थेट इशारा
राहुल गांधींनी लेखाच्या शेवटी थेट इशारा देताना, "या निवडणुकीचा अभ्यास करा, सत्य समोर आणा, आणि उत्तर मागा - कारण महाराष्ट्रातील खेळ कुठेही पुन्हा होऊ शकतो," असं म्हटलं आहे.
भाजपाचं उत्तर
भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. "पराभवाच्या मानसिकतेतून राहुल गांधी अजूनही बाहेर येत नाहीत. राहुल गांधी यांनी खरंतर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं. लोकसभा जिंकल्याच्या नादात 31 जागा त्यांना मिळाल्या 17 जागा आम्हाला मिळाल्या, त्यावेळी राहुल गांधी ओवर कॉन्फिडंट झाले," असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.
33 लाख मतं कमी झाली
"निवडणूक जिंकण्याचा काम आता घरोघरी जाण्याचा जनसंवादाचा काम असतं ते विसरून गेले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीवर विश्वास केला मोदींच्या कामावर विश्वास ठेवला. आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने आम्ही 3 कोटी 17 लाखावर गेलो आणि ते 2 कोटी 17 लाखावर आले, म्हणजे राहुल गांधी यांना कळायला पाहिजे की आपली 33 लाख मतं कमी झाली आहेत," असंही बावनकुळेंनी उत्तरात म्हटलंय
या गोष्टीचा अभ्यास करा
"राहुल गांधी यांनी याचा अभ्यास केला पाहिजे की 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीला सात कोटी 29 लाख मतं महाराष्ट्रात मतदार होते. महाराष्ट्रामध्ये 2009 च्या विधानसभा निवडणुकीला मतदान वाढवून सात कोटी 29 लाख मतदार झाले. त्यावेळी त्यांचे सरकार होतं. केंद्रात, राज्यात त्यांचे सरकार होती मग ही 30 लाख मतं कशी वाढली होती?" असा सवाल बावनकुळेंनी केला आहे.
आम्ही लोकांमध्ये जातो
"निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन नोंदणी केली होती याद्या दुरुस्त केल्या आहेत. कामठी विधानसभेच्या काँग्रेसने आपल्या बुथवार 17000 मतांचे नोंदणी केली आहे. निवडणूक आयोगाने घरोघरी फिरून सगळ्या भागात नोंदणी केल्याने कामठी विधानसभेत सातत्याने प्रत्येक वेळी तीन-चार निवडणुका बघा कामठी विधानसभा ही सब अर्बन होत आहे. तीन विधानसभा निवडणुकीत कामठी विधानसभेत 30000 मतं वाढली आहे. राहुल गांधी हे संभ्रमात आहेत. आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर लोकांकडे जात आहोत," असं बावनकुळे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.