भाजपच्या पदाधिकाऱ्याने पुणे महापालिकेच्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा गेल्या पाच महिन्यांपासून मानसिक त्रास देऊन छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत संबंधित महिला अधिकाऱ्याने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली असून, महापालिकेने भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेत पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी केल्याबाबचे परिपत्रक पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले आहे.
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार दिलीप कदम याच्याकडून गेल्या पाच महिन्यांपासून पालिकेतील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला त्रास देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या दालनात जमावाने जाऊन छायाचित्रीकरण करणे, कार्यालयाचा दरवाजा बंद करणे, धमकावणे असे प्रकार भाजप पदाधिकाऱ्याकडून सुरू होते. याबाबत संबंधित महिला अधिकाऱ्याने महापालिका आयुक्त, आरोग्य विभागप्रमुख यांच्याकडे तक्रार केली होती. त्याकडे सुरवातीला दुर्लक्ष केले गेले.
भाजप नेत्यांनी दखल घेतली नाही !
त्यानंतर संबंधित महिला अधिकाऱ्याने महापालिकेच्या अंतर्गत महिला तक्रार समितीकडे तक्रार केली होती. एवढ्यावर न थांबता न्याय मिळत नसल्याने भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ , राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपच्या माजी नगरसेविका यांच्याकडे देखील दाद मागितली होती. तरीदेखील भाजपने आपली दखल घेतली नसल्याचं या महिला अधिकाऱ्याकडून सांगण्यात आला आहे.दरम्यान, प्रकरणाच्या अनुषंगाने आता महापालिका आयुक्तांना एक परिपत्रक काढला आहे. ज्यामध्ये महापालिकेत 17 फेब्रुवारी 2025 रोजी काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतील महिला आरोग्य अधिकाऱ्यांवर, त्यांच्या कर्तव्य बजावणी दरम्यान पूर्व परवानगी न घेता महिला कर्मचारी यांचे व्हिडीओ चित्रीकरण करणे, दमदाटी करणे, अर्वाच्य भाषा वापरणे याशिवाय दालनाबाहेर जाण्यास मज्जाव करत त्यांच्या कक्षात गोंधळ निर्माण करून जाणीवपूर्वक बदनामी करून त्यांना मानसिक त्रास दिला, अशी तक्रार कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा, 2013 अन्वये प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त यांनी परिपत्रक काढत या दोन्ही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर महापालिकेत प्रवेशाला बंदी घातली आहे.
..तर राजीनामा देईल!
कोणत्याही महिला अधिकाऱ्याला त्रास दिला नाही. आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तक्रारी आल्यानंतर आम्ही माहिती अधिकारात माहिती मागितली. या माहितीत तथ्य असल्याने बदली होण्याच्या भीतीने महिला अधिकाऱ्याने महिला आयोगाकडे तक्रार दिली आहे. दोषी आढळल्यास पक्षाच्या पदाचा राजीनामा देईन, असे ओंकार कदम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.