जर तुम्हीही सोन्याचे कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या कर्जाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे कर्जदारांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळू शकतील. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी सांगितले की, मध्यवर्ती बँकेने २.५ लाख रुपयांपर्यंत सोन्याचे कर्ज घेणाऱ्यांसाठी कर्ज-मूल्याचे (LTV) प्रमाण ८५ टक्के केले आहे. जे सध्या ७५ टक्के आहे.
चलनविषयक धोरण बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, सोन्यावरील अंतिम नियम आज किंवा सोमवारपर्यंत जाहीर केले जातील. सोन्याच्या कर्जासाठी एलटीव्ही प्रमाण वाढल्याने जर तारण ठेवलेले सोने १ लाख रुपयांचे असेल तर कर्ज घेणारा आता त्याच सोन्यावर ७५,००० रुपयांऐवजी ८५,००० रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकते.
आरबीआयच्या या निर्णयामुळे घरे आणि लहान व्यवसायांसाठी निधीची उपलब्धता सुलभ होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि आपत्कालीन परिस्थितीत रोख रकमेची गरज भासणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. मल्होत्रा म्हणाले की, कर्जदारांसाठी गोष्टी सुलभ करण्यासाठी लहान कर्जांवरील क्रेडिट मूल्यांकन आवश्यकता काढून टाकल्या जातील.
सोन्याच्या तारणावर कर्ज देण्याच्या मसुद्याच्या मार्गदर्शक तत्वांच्या तरतुदींमधून रिझर्व्ह बँकेने २ लाख रुपयांपर्यंतच्या लहान कर्जदारांना वगळावे असे अर्थ मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सुचवल्यानंतर नियमांमध्ये शिथिलता आली आहे. अर्थ मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्याची सूचनाही केली आहे.अर्थ मंत्रालयाने म्हटले होते की, "सोने तारण ठेवून कर्ज देण्यासाठी आरबीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्याची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मार्गदर्शनाखाली वित्तीय सेवा विभागाने (डीएफएस) तपासणी केली आहे. लहान सुवर्ण कर्ज घेणाऱ्यांच्या गरजांवर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी डीएफएसने आरबीआयला सूचना केल्या आहेत.३० मे रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आरबीआय मसुदा मार्गदर्शक तत्त्वांवर मिळालेल्या अभिप्रायाचा आढावा घेत आहे. मार्गदर्शक तत्त्वांना अंतिम स्वरूप देण्यापूर्वी विविध भागधारकांनी उपस्थित केलेल्या चिंता तसेच जनतेकडून मिळालेल्या अभिप्रायाचा आरबीआयकडून योग्य विचार केला जाईल अशी अपेक्षा आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.