डीजी लोनसाठी एसपी ऑफिसच्या लिपिकाने घेतली लाच, भावजींच्या फोनपेवर पाठवायला लावले ३ हजार; दोघांना अटक
छत्रपती संभाजीनगर : - पोलिस अंमलदाराला डीजी लोनचे काम लवकर करून देण्याच्या बदल्यात लाच घेणाऱ्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाला एसीबीच्या पथकाने पकडले. लिपिकाने तक्रारद-ाराला ३ हजारांच्या लाचेची मागणी करून स्वतःच्या भावजींच्या फोनपेवर पैसे पाठवायला लावले.
त्यामुळे त्याच्या भावजीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार सोमवारी (दि. २३) ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात घडला. पोलिस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सुभाष रामदास नवलू (४७) आणि त्याचे भावजी कमलेश गोकुळ इंदूरकर (४७, रा. गवळीपुरा, छावणी) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांनी दिली.अधिक माहितीनुसार, ३२ वर्षीय तक्रारदार पोलिस अंमलदार यांनी परांडा (ता. अंबड, जि. जालना) येथे प्लॉट खरेदी केलेला आहे. बांधकामासाठी घर बांधणी अग्रीम (डीजी लोन) मिळण्यासाठी त्यांनी ७ एप्रिलला अर्ज केला आहे. त्यानंतर तक्रारदार काही दिवसांनी माहिती विचारण्यासाठी ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक नवलूकडे गेले.
तेव्हा त्याने घर बांधणी डीजी लोनचे काम माझ्याकडे असून प्रस्ताव लवकरात लवकर पाठविण्यासाठी व डीजी लोन मंजूर करून मदत करण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर ५ मे रोजी नवलूने पुन्हा फोन करून ऑफिसला बोलावून घेतले. काम फास्ट करून देतो म्हणत पुन्हा पैशाची मागणी केली. मात्र, तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने पडताळणी केली त्यात नवलूने लाच मागणी करून फोन पे वर पाठवण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
पैसे मिळाल्याची खात्री होताच दोघांना अटक
सोमवारी (दि. २३) नवलूच्या सांगण्याप्रमाणे इंदूरकरच्या फोनपेवर ३ हजार रुपये पाठविले. त्यानंतर एसीबीने पैसे मिळाल्याची खात्री झाल्यानंतर दोघांना ताब्यात घेतले. नवलूच्या अंग झडतीत मोबाईल व २१०० रुपये तर कमलेशकडे मोबाईल आणि ३५४० रुपये मिळले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, केशव दिंडे, अंमलदार राजेंद्र सिनकर, राजेंद्र नंदिले, विलास चव्हाण यांनी केली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.