वेगवान इंटरनेटच्या क्षेत्रात क्रांती म्हणून गणल्या जाणाऱ्या एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक' या उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या इंटरनेट सेवेला येत्या दोन महिन्यांत देशाच्या काही भागांत सुरुवात होणार आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेसाठी आवश्यक 'सॅटेलाइट डिश' उपकरणाची किंमत अंदाजे ३३ हजार रुपये ठेवली असून, मासिक अमर्यादित 'डेटा प्लॅन' अंदाजे तीन हजार रुपये असू शकतो. सध्या देशात मिळणाऱ्या इंटरनेटच्या तुलनेत ही रक्कम जास्त असली तरीही दुर्गम भागांसाठी ही सेवा वरदान ठरू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एक महिना विनामूल्य सबस्क्रिप्शन?
ही सेवा देशात आल्यानंतर सुरुवातीस 'स्टारलिंक'कडून प्रत्येक उपकरण खरेदीसह एक महिना विनामूल्य चाचणी कालावधी देण्याची योजना आखत आहे. एक महिना ही सेवा वापरल्यानंतर मासिक रक्कम भरून पुढील सेवा ग्राहकांना घेता येईल. सॅटेलाइट इंटरनेट सेवा भारतातील दुर्गम भागांमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. पारंपरिक ब्रॉडबँड इंटरनेटसाठी पायाभूत सुविधा उभारणे कठीण आहे, तेथे हे इंटरनेट पोहोचू शकणार आहे. भौगोलिक अडचणी असलेल्या भागांमध्ये स्टारलिंकचे 'लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट' इंटरनेटची सेवा देण्याचे काम करतील. 'स्टारलिंक' डिश आणि उपकरणांची किंमत आशियातील इतर देशांमधील किमतीप्रमाणे असेल.
स्टारलिंकचा भारतातील प्रवास लांबला
बांगलादेश, भूतान या देशांमध्ये 'स्टारलिंक' उपकरणाची किंमत अंदाजे ३३ हजार रुपये आहे. 'स्टारलिंक'च्या भारतीय बाजारपेठेतील प्रवेशामुळे देशाच्या दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होऊ शकते आणि ग्रामीण भागांतील शैक्षणिक संस्थांमधील; तसेच दुर्गम भागांतील व्यवसायांसाठी 'कनेक्टिव्हिटी' उपलब्ध होणार आहे. दूरसंचार विभागाने 'स्टारलिंक'ला 'ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट'चा परवाना दिला आहे. हा परवाना मिळाल्यानंतर 'स्टारलिंक'ची सेवा भारतात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 'स्टारलिंक' २०२१ पासून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छित होती. मात्र, काही नियम व अटींमुळे हा प्रवेश लांबला होता. काही दिवसांतच कंपनीला स्पेक्ट्रम मिळतील आणि त्यानंतर त्याचे काम सुरू होईल, असे सांगितले जाते.
असे मिळते उपग्रहाद्वारे इंटरनेट
दळणवळणविषयक अन्य उपग्रहांच्या तुलनेत इंटरनेटसाठीचे उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेमध्ये ठेवले जातात.
इतर उपग्रहांच्या तुलनेत हे उपग्रह जवळ असल्यामुळे इंटरनेटचा वेग जास्त राहतो.
दुर्गम भागांमध्ये इंटरनेट पोहोचण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो.
'स्टारलिंक'चे हजारो उपग्रह पृथ्वीपासून सुमारे ५०० ते १०० किलोमीटर उंचीवर प्रदक्षिणा घालत आहेत.
डिशच्या साह्याने सिग्नलद्वारा यूझरला इंटरनेट मिळते. 'स्पेसएक्स'ने आतापर्यंत ६ हजारांहून अधिक उपग्रह यासाठी वापरणे सुरू केले असून, येत्या काळात ही संख्या वाढणार आहे.
३३ हजार रुपये....
या इंटरनेट सेवेसाठी सध्याच्या डीटीएच प्रमाणं घरावर डिश बसवावी लागेल. या डिशची किंमत ३३ हजार रुपये असेल. तर इंटरनेट वापराचे महिन्याचे शुल्क अंदाजे ३ हजार रुपये असणार आहे. या किंमतीत अमर्यादित इंटरनेट युजरला वापरता येईल. सध्या स्टारलिंकचं हे इंटरनेट जगातील १०० देशांमध्ये सेवा देत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.