महाराष्ट्र पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मद्याच्या नशेत एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात संबंधित व्यक्तीने तक्रार केल्यावर गोंदिया पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तसेच मद्यपान करुन मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाला निलंबित केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील पोलीस विभाग सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील डूग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत कांचन राहुले या पोलीस कर्मचाऱ्याने केलेला प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यावर जात असताना छत्तीसगड राज्यातील सुनितकुमार मांडवी यांनी कट मारून ओव्हरटेक केल्याच्या आरोप करून त्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. कांचन राहुले याने मद्याच्या नशेत हा प्रकार केला. ही घटना ही 19 मे रोजी घडली. परंतु त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. संबंधित व्यक्तीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यावर गोंदिया पोलिसांनी ॲक्शन मोडवर आले. पोलीस प्रशासनाने राहुले याला निलंबित केले आहे. या प्रकारचे कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्याची गय केली की जाणार नाही, अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांना दिली.
छत्तीसगडमधील रहिवाशी मांडवी यांनी म्हटले की, मला पोलीस कर्मचारी राहुले याने बेदम मारहाण केली. त्यासंदर्भात मी तक्रार दिली. त्यानंतर त्याचे निलंबन झाले. परंतु फक्त निलंबन करुन हा प्रकार थांबवू नये. त्याच्यावर विविध कलमांनी गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई केली पाहिजे. आता हा व्हिडिओ समाज माध्यमावर झाल्यामुळे माझी प्रतिष्ठा समाजामध्ये मलीन झाली आहे. यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीतून बळतर्फ करावे, अशी माझी पोलीस विभागाकडे मागणी आहे, असे मांडवी यांनी म्हटले. पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांनी सांगितले की, मद्याच्या नशेत पोलिसाने सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली. त्यासंदर्भात पोलीस शिपाई कांचन राहुले याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. पोलिसांचा तपास सुरु आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.