शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांना इलेक्शन ड्युटी, पालिकेच्या २,१०० शिक्षकांना १५ जूनपूर्वीच हजर राहण्याचे आदेश
मुंबई :- शाळा सुरू होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे 'मिशन ॲडमिशन' मोहिमेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदार यादी पुनरीक्षणासाठी मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ जून २०२५ पूर्वीच शिक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आधीच शिक्षक कमतरतेचा सामना करणाऱ्या महापालिका शाळांमध्ये आणखी गोंधळ वाढेल. शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
१२ जून रोजी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, मुंबई शहर आणि उपनगर विभागांत एकूण ८ हजार कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी आवश्यकता आहे. त्यापैकी २,१०० कर्मचारी शिक्षण विभागातून, तर ४,९०० कर्मचारी आरोग्य विभागातून घेतले जाणार आहेत. बीएलओ आणि बीएलओ सुपरवायझर या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी ही नियुक्ती केली जाणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यासाठी ४०० आणि उपनगर जिल्ह्यासाठी १,७०० शिक्षकांची मागणी करण्यात आली आहे.
पूर्णवेळ कार्यरत राहणार
शिक्षण अधिकाऱ्यांनी ही संख्या निश्चित करून, नियुक्त शिक्षकांची नावे १५ जूनपूर्वी जिल्हाधिकारी मुंबई शहर आणि उपनगर कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हे शिक्षक निवडणूक विभागात पूर्णवेळ कार्यरत राहतील, असेही या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. हे आदेश महापालिकेचे सामान्य प्रशासन अधिकारी स. तु. शिरवाडकर यांनी जारी केले आहेत. शिक्षक संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये आधीच ८०० पेक्षा अधिक शिक्षकांची कमतरता आहे. शाळा सुरू होण्याच्या काळात शिक्षकांना इतरत्र पाठवणे म्हणजे विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यासारखे आहे.
-शरद सिंग, अध्यक्ष, बृहन्मुंबई शिक्षक सभा
संबंधित पत्राबाबत अद्याप मला थेट माहिती नाही. पत्र कार्यालयात आले असेल; पत्र पहिल्यानंतरच मी सविस्तर बोलू शकेन.
- राजेश कंकाळ,
शिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका
८ हजार कर्मचारी
शहर आणि उपनगर विभागात निवडणुकीच्या कामासाठी लागणार आहेत. तसे परिपत्रक काढण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.