विट्यात सव्वातीन लाखांचे मोबाईल जप्त; मोबाईल मूळ मालकांना केले परत
विटा : विटा पोलिस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे गहाळ झालेल्या ३ लाख २५ हजार रुपये किमतीच्या मोबाईलचा शोध घेऊन ते जप्त केले. हे मोबाईल मूळ मालकांना परत केल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले. पोलिस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल गहाळ झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
गिरिदेव वसंतराव पाटील (पंचलिंगनगर, ता. खानापूर) यांनी २३ डिसेंबर २०२४ रोजी मोबाईल गहाळ झाल्याची फिर्याद दिली. त्या अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून राज्यातील विविध जिल्ह्यांतून तीन लाख २५ हजार रुपयांचे २५ मोबाईल शोधून काढले. ते मूळ मालकांना परत केले. विटा शहर सांगली जिल्ह्यातील व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे.
त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून दररोज नोकरी, शिक्षण, तसेच बाजारामध्ये नागरिक येत असतात. त्यावेळी प्रवास, बाजारपेठ, बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे, असे श्री. फडतरे यांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अमोल पाटील, उत्तम माळी, किरण खाडे, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, रोहिणी शिंदे, सुषमा देसाई, विवेक सांळुखे यांनी केली. दरम्यान, परत मिळालेल्या मोबाईलधारकांकडून पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.