२१ जून रोजी भारत सरकारच्या पुढाकाराने दरवर्षी साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनाचे यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे "भक्ती योग". सांगली जिल्हा परिषदेच्या आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. तृप्ती दोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागाने हा उपक्रम जागतिक स्तरावर ऐतिहासिक ठरणार आहे. सकाळी ८.०० ते ८.४५ या वेळेत, सांगलीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून मुख्य केंद्र असून जिल्ह्यातील इतर केंद्र ऑनलाईन जोडली जाणार आहेत.
या उपक्रमात दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री. रावसाहेब पाटील यांनी जैन समाजातील सर्व संस्था, मंदिरे, शिक्षणसंस्था, ट्रस्ट, पतसंस्था, व्यापारी व नागरिकांना सहभागाचे आवाहन केले आहे. जैन समाजाच्या शाळा, महाविद्यालये, मंदिरे, सामाजिक संस्था, व्यावसायिक प्रतिष्ठाने, बँका, पतसंस्था, ट्रस्ट, सांस्कृतिक भवन, हॉस्टेल्स ही "योग केंद्र" म्हणून नोंदणी करावी. योग केंद्र म्हणून नोंदणी होण्यासाठी योग केंद्रावर किमान 50 लोकांचा सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक आहे. असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे. नोंदणीसाठी www.bhaktiyogsangli.com या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रक्रिया सुरू असून सहभागी साधकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही सांगितले. भक्ती योग हा उपक्रम भक्ती, एकता आणि आरोग्याचा जागतिक संदेश देणारा असून, तो समाजाशी, संस्कृतीशी आणि चैतन्याशी जोडणारा आहे. या ऐतिहासिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन समाजातील तरुणाई, महिलावर्ग, विद्यार्थी, व्यावसायिक, सेवक वर्ग यांनी उत्स्फूर्त सहभाग द्यावा, असेही श्री. रावसाहेब पाटील यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.