कोल्हापूर :- हॉटेलमध्ये दोन दिवस राहिली. रूम सोडताना मॅनेजरने बिल मागितल्यावर मी पोलिस तपासणीसाठी आले आहे, अशी खोटी माहिती सांगून पाच हजार रुपये द्या; अन्यथा विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करेन, अशी धमकी देणार्या तोतया महिला पोलिसाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. हॉटेलमध्ये फुकट राहण्यासाठी रुबाब
मारणार्या तोतया पोलिसाचे नाव सानिया दिलावर मुल्ला (वय 25, रा. सोमवार
पेठ, मल्लिकार्जुन मंदिराजवळ, मिरज, जि. सांगली) असे आहे. पोलिसांनी तिला
अटक केली आहे.
रोहित शामराव पन्हाळकर (30, रा. हॉटेल अनुग्रह, एस.टी. स्टँडसमोर, कोल्हापूर, मूळ रा. हालेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर) यांनी मुल्ला हिच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. मुल्ला ही हॉटेलमधील रूम नं. 204 मध्ये दोन दिवस राहिली होती. 2 जून रोजी सकाळी 10 वाजता रूम सोडताना मुल्ला हिने पन्हाळकर यांना धमकी दिली. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर मुल्ला हिची तारांबळ उडाली. दरम्यान, मुल्ला हिने यापूर्वी एस.टी. स्टँड येथे दोन महिलांना माझ्याकडे का बघितले? म्हणून मारहाण केली होती. त्यावेळी संबंधित महिलांनी पोलिसांत तक्रार देऊ, असे सांगितले असता त्यांनाही काय करताय करा... मी पोलिस आहे, अशी धमकी दिली होती, असे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.